भारताने पाकिस्तानविरुद्ध राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला समर्पित करत ठेवण्यात आलेल्या ‘सिंदूर’ उड्डाणपुलाचे उद्घाटन आज (१० जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. मुंबईतील मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि’ मेलो मार्गाला जोडणारा हा पुल आहे. विशेष म्हणजे, ‘कर्नाक पूल’ असे याचे पूर्वीचे नाव होत मात्र, ते नुकतेच बदलून ‘सिंदूर’ असे ठेवण्यात आले. दरम्यान, दुपारी ३ नंतर हा पूल वाहनधारक आणि पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात येणार आहे.
स्वकीयांवर अत्याचार करणारा असा कर्नाकचा इतिहास
सिंदूर पुलाचे उद्घाटन पार पडल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, अतिशय महत्वाचा असलेला ‘सिंदूर’ उड्डाणपुल पूर्वीचा कर्नाक ब्रिज याचे आज उद्घाटन केले. मुंबईत महापालिकेने कमी वेळात, उत्कृष्ट असे पुलाचे बांधकाम केले. अनेक अडचणी असून सुद्धा देण्यात आलेल्या टाईमलाईनच्या आत पुलाचे काम केले, यासाठी महापालिका आयुक्त आणि टीमचे सर्वांचे अभिनंदन.
अनेक वर्ष या पुलाची कर्नाक ब्रिज म्हणून ओळख होती. मुंबई प्रांताचे माजी गव्हर्नर जेम्स रिवेट कर्नाक यांच्या नावाने हा ब्रिज होता. स्वकीयांवर अत्याचार करणारा असा कर्नाकचा इतिहास आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी जो साताऱ्याचा इतिहास लिहिला आहे. त्यामध्ये प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापू असे एक प्रकरण आहे. त्यात कशाप्रकारे कर्नाकने छत्रपतींना बंडाच्या आणि खुनाच्या आरोपामध्ये फसवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला कसे महाराज प्रतापसिंह पुरून उरले, याचे उत्कृष्ट वर्णन त्यामध्ये आहे. प्रतापसिंह महाराज, मुधोजी राजे असतील या सर्वांना फसवण्याचा प्रयत्न करणारा आणि भारतीयांवर अत्याचार करणारा अशा प्रकारचा कर्नाक, या काळ्या इतिहासाची पाने पुसली पाहिजेत.
ते पुढे म्हणाले, देशाचे पंतप्रधान मोदींनी सांगितले कि इतिहासात जे काळे चाप्टर आहेत ते संपले पाहिजेत आणि स्वातंत्र्यानंतर या काळ्या खुणा मिटल्या पाहिजेत, त्याचाच एक भाग म्हणून या पुलाचे नाव बदलण्यात आले. भारतीय सेनेने दाखवलेले अतुलनीय शौर्य, भारताची ताकद काय ते जगाला दाखवून दिली. पाकिस्तानच्या शेवटच्या टोकापर्यंत घुसून त्यांची तळे कशी उध्वस्त केले ते भारताच्या सेनेने दाखवून दिले. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरच्या नावाने यापुलाचे नाव सिंदूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईतल्या वाहतुकीकरिता हा पुला अतिशय उपयुक्त असले हा विश्वास व्यक्त करतो आणि सिंदूर पुल मुंबईकरांसाठी समर्पित झाल्याचे घोषित करतो.