डावखुरा फलंदाज तिलक वर्माच्या नाबाद ६९ धावांच्या जोरावर भारताने आशिया चषक टी 20 क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ५ विकेट्सनी मात करत ही स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत एकही सामना न गमावताना भारताने पाकिस्तानवर हा स्पर्धेतील तिसरा विजय मिळवला.
तिलक वर्माला शिवम दुबे (३३) आणि संजू सॅमसन (२४) यांची साथ लाभली. पाकिस्तानच्या १४६ धावांचा पाठलाग करताना भारताची ३ बाद २० अशी बिकट परिस्थिती असताना संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी ५७ धावांची भागीदारी रचत संघाला सावरले. पण सॅमसन बाद झाल्यावरही भारताला ६९ धावांची गरज होती. पण डावखुरा शिवम दुबेने तिलक वर्माला छान साथ देत पाचव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी करत भारताला विजयासमीप आणले. शेवटच्या दोन षटकात भारताला १७ धावांची आवश्यकता होती. साहजिकच धाकधूक वाढली.
१९व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर दुबे बाद झाला तेव्हा भारताला ६ चेंडूत १० धावा हव्या होत्या. त्यावेळी रौफच्या गोलंदाजीवर तिलकने पहिल्या चेंडूवर २ धावा काढल्या तर पुढच्या चेंडूवर षटकार लगावला. त्यामुळे भारताला अखेरच्या चार चेंडूत २ धावा हव्या होत्या. तिलकने एक धाव काढत बरोबरी साधून दिली तर नवा कोरा फलंदाज रिंकू सिंगने चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
हे ही वाचा:
कंप्यूटर आणि मोबाईलमुळे वाढतेय सर्व्हायकल पेनची समस्या
भारताची प्रवासी वाहन विक्री दोन टक्क्यांनी वाढणार
कर्णधार सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने सलग तीनवेळा पाकिस्तानला या स्पर्धेत नमवले. भारताने पाकिस्तानशी खेळू नये यावरून भारतात राजकारण खेळले गेले पण भारतीय संघाने पाकिस्तानला प्रत्येक सामन्यात दणका देत विरोधकांना चोख उत्तर दिले.
त्याआधी भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजी दिली. सलामीवीर साहिबजादा फरहान (५७) आणि फखर झमान (४६) यामुळे पाकिस्तानने १४६ धावसंख्येपर्यंत मजल मारली पण भारताने ५ बाद १५० धावा करत ऐतिहासिक विजय साकारला.
