भारत–अमेरिका व्यापार कराराबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान, माजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मौद्रिक धोरण समिती (MPC) सदस्य आणि अर्थतज्ज्ञ आशिमा गोयल यांनी स्पष्ट मत मांडले आहे की भारताची अर्थव्यवस्था अमेरिकेवर इतकी अवलंबून नाही की कोणत्याही करारात अडथळा आला तरी भारताला मोठा धोका निर्माण होईल.
आशिमा गोयल यांनी सांगितले की भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार महत्त्वाचा असला तरी तो भारताच्या एकूण व्यापाराच्या तुलनेत मर्यादित आहे. अनेक आशियाई देशांच्या तुलनेत भारताची अमेरिकाकडे असलेली निर्यात कमी आहे. त्यामुळे अमेरिकेसोबतचा करार उशिरा झाला किंवा काही अडचणी निर्माण झाल्या तरी भारताच्या आर्थिक वाढीवर फारसा परिणाम होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
इंडियन आयडल विजेता प्रशांत तमांग यांचे ४३व्या वर्षी निधन
इराणमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप?
पोलिस चकमकीत प्रह्लाद कुमार जखमी
वाहन कर्ज फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
जागतिक अर्थव्यवस्थेतील बदलांकडे लक्ष वेधताना गोयल म्हणाल्या की आज जागतिक वाढीमध्ये उदीयमान अर्थव्यवस्था यांचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे. भारतासाठी फक्त अमेरिका हाच एकमेव पर्याय नसून आशिया, आफ्रिका, युरोप आणि लॅटिन अमेरिकेसारख्या अनेक बाजारपेठा उपलब्ध आहेत. त्यामुळे भारताला व्यापारासाठी पर्यायी भागीदार शोधणे शक्य आहे.
त्यांनी हेही नमूद केले की भारताची चलनवाढ नियंत्रणात आहे आणि व्याजदर, विनिमय दर यांसारख्या बाबतीत भारत स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम आहे. त्यामुळे अमेरिकेतील आर्थिक धोरणांचा भारतावर थेट दबाव येत नाही.
तथापि, गोयल यांनी हेही स्पष्ट केले की भारत अमेरिकेसोबत मजबूत संबंध ठेवण्यास इच्छुक आहे. मोठा एनआरआए समुदाय, तंत्रज्ञान सहकार्य आणि गुंतवणूक यामुळे अमेरिका भारतासाठी महत्त्वाचा भागीदार आहे. मात्र, कोणताही व्यापार करार घाईघाईने न करता, देशातील शेती आणि संवेदनशील क्षेत्रांचे हित जपूनच केला पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
एकूणच, भारताची अर्थव्यवस्था आत्मनिर्भर होत असून, जागतिक स्तरावर भारताकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, असा विश्वास माजी आरबीआय एमपीसी सदस्य आशिमा गोयल यांनी व्यक्त केला आहे.
