भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांच्या घरावर मोर्चा

श्रीरंग बरगे यांचा इशारा

भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांच्या घरावर मोर्चा

सटीच्या अमरावती विभागात उघड झालेल्या विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून वातावरण तापले असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे. हा प्रकार तात्काळ थांबवला नाही तर संबंधित लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल, असा थेट इशाराही त्यांनी दिला.

अमरावती येथील काँग्रेस भवनात आयोजित एसटी कामगारांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

बरगे म्हणाले की, एसटीच्या अमरावती विभागात अलीकडच्या काळात पास घोटाळा, तिकीट घोटाळा तसेच मद्यपानाशी संबंधित प्रकार उघडकीस आले आहेत. एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागाने काही अधिकाऱ्यांना दोषीही ठरवले आहे. मात्र तरीही अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे काही अधिकारी आणि लोकप्रतिनिधी अजूनही जिल्ह्यात ठाण मांडून बसले आहेत.

ते पुढे म्हणाले, एखाद्या वाहकाकडून दोन-पाच रुपयांची चूक झाली तरी त्याला तात्काळ निलंबन, बदली किंवा बडतर्फीची कारवाई केली जाते. किरकोळ अपघातात गाडीचा पत्रा जरी घासला गेला तरी चालकांकडून वसुली केली जाते. गाडी ब्रेकडाऊन झाली तर यांत्रिकांनाही दोषी धरले जाते. मात्र लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

महामंडळ सध्या अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडले असल्याचे सांगत, भ्रष्टाचारावर लगाम घालण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठोस भूमिका घेतली आहे. मात्र अमरावतीतील काही लोकप्रतिनिधी त्यांच्या भूमिकेलाच छेद देण्याचे काम करत असल्याचा आरोपही बरगे यांनी केला.

यापुढे तरी अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम लोकप्रतिनिधींनी करू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या मेळाव्याला शहर काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बबलू शेखावत, संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप मुळे, कार्याध्यक्ष प्रवीण नरोडे, सचिव जयंत मुळे, ज्येष्ठ नेते दादाराव डोंगरे, तसेच योगेश कोकाटे, सागर गावंडे, प्रवीण चरपे, शिवदास स्वर्गे, पंकज देशमुख, धीरज गोगटे, मनीष तिवारी, रणजीत तायडे, गजानन लव्हाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, या मेळाव्यात इतर संघटनांमधील १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने एसटी कर्मचारी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Exit mobile version