इंग्लंडला नमवत भारताच्या मुलींनी रचला इतिहास!

इंग्लंडला नमवत भारताच्या मुलींनी रचला इतिहास!

भारताच्या महिला क्रिकेट संघाने इंग्लंडच्या भूमीवर एक अभूतपूर्व कामगिरी करत इतिहास रचला आहे. चेस्टर-ले-स्ट्रीट येथे खेळलेल्या निर्णायक तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडला १३ धावांनी पराभूत करत २-१ ने मालिका जिंकली.

या विजयासोबतच भारताच्या महिला संघाने इंग्लंड दौऱ्यातच टी20 आणि वनडे दोन्ही मालिकांवर कब्जा केला आहे — जे पहिल्यांदाच घडलं आहे. याआधी भारताने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत ३-२ असा विजय मिळवला होता.

आधीही गाजवलेले विदेशी दौरे

या ऐतिहासिक कामगिरीपूर्वी भारताच्या महिला संघाने दक्षिण आफ्रिका (२०१८), श्रीलंका (२०१८ व २०२२), आणि वेस्ट इंडीज (२०१९) दौऱ्यांवरही अशाचप्रकारे दोन्ही मालिका जिंकल्या आहेत.


हरमनप्रीतचा शतक, क्रांतीचा षटकाळ

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावत ३१८ धावांचा डोंगर उभारला. कर्णधार हरमनप्रीत कौरने ८४ चेंडूंमध्ये १४ चौकारांसह १०२ धावांची जबरदस्त खेळी केली.

ओपनिंग जोडी प्रतिका रावल (२६) आणि स्मृती मंधाना (४५) यांनी दमदार सुरुवात केली. त्यानंतर हरलीन देओल (४५) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (५०) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिलं.


इंग्लंडची लढत फोल ठरली

इंग्लंडच्या संघानेही चिवट झुंज दिली. एम्मा लॅम्ब (६८) आणि कर्णधार नतालिया सायव्हर-ब्रंट (९८) यांच्या भागीदारीमुळे इंग्लंडच्या आशा उंचावल्या. मात्र भारताच्या गोलंदाजांनी निर्णायक क्षणी विकेट्स घेत सामना आपल्या बाजूने वळवला.

भारताकडून क्रांती गौड हिचा जबरदस्त खेळ पाहायला मिळाला – तिने केवळ ५२ चेंडूंमध्ये ६ बळी टिपत इंग्लंडचा डाव कोसळवला.
श्री चरणीने २ तर दीप्ती शर्माने १ बळी घेतला.


भारतीय महिला क्रिकेटच्या गौरवाचा नवा अध्याय

या विजयासह भारताच्या महिला क्रिकेट संघाने केवळ एक ऐतिहासिक मालिका जिंकली नाही, तर आगामी काळासाठी एक सशक्त संदेशही दिला — की जागतिक स्तरावर आता ‘भारताच्या मुली’ कोणालाही मागे नाहीत!


📌 महत्त्वाचे मुद्दे:

Exit mobile version