शेफाली वर्माची ८७ धावांची चिवट खेळी आणि दीप्ती शर्माचे अर्धशतक (५८) तसेच ५ बळी आणि स्मृती मानधनाच्या ४५ धावांच्या जोरावर भारतीय महिला संघाने वनडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इतिहास रचला आणि विश्वविजेतेपदावर प्रथमच नाव कोरले. नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताने ५२ धावांनी दणदणीत विजय मिळवून विश्वचषक यावेळी हातून निसटू दिला नाही. योगायोग म्हणजे कर्णधार हरमनप्रीतने नदीन क्लर्कचा झेल पकडला आणि जणू भारताच्या हातात विश्वचषकच विसावला. भारताने तब्बल २५ वर्षांनी विजेतेपद पटकावले.
दीप्ती शर्माने ५८ धावा केल्याच पण दक्षिण आफ्रिकेचे ५ बळी घेत अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर विजेतेपदात मोलाचे योगदान दिले.
भारताच्या या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर प्रतिक्रिया दिली की भविष्यातील विजेत्यांसाठी हा प्रेरणादायी विजय आहे.
हे ही वाचा:
दिव्यांग हक्कांचे संरक्षण : आयुक्तांची कार्यपद्धती निश्चित
स्वप्नात देवाचे दर्शन होणे हे कसले संकेत ?
देव उठनी एकादशी निमित्त आदर्श बंधु संघाचा अनोखा सेवा उपक्रम
नवनीत राणा यांना दुसऱ्यांदा बॉम्बने उडवण्याची धमकी
भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २९९ धावांचे आव्हान ठेवले मात्र दक्षिण आफ्रिकेचा डाव २४६ धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर लॉरा वोलवार्टने १०१ धावांची खेळी केली पण तिची झुंज एकाकी ठरली.
२००५, २००७ या वर्षी भारताला अंतिम फेरीत प्रवेश करूनही विजेतेपदाने हुलकावणी दिली. २०१७ ला हातातोंडाशी आलेला विजय भारताच्या हातून निसटला आणि पुन्हा भारताचे स्वप्न अपुरे राहिले. यावेळी मात्र उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला कठीण अशा सामन्यात पराभूत केल्यावर भारतीय महिलांचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला आणि अंतिम सामन्यात तो भारतीय महिलांनी सार्थ ठरवला.
लॉरा वोल्वार्टच्या सर्वाधिक धावा
दक्षिण आफ्रिकेची फलंदाज लॉरा वोल्वार्ट आणि भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना यांनी चालू स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. दोन्ही खेळाडू स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या शर्यतीत होत्या. पण वोल्वार्ट स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली.
वोल्वार्टने स्पर्धेत एकूण ५७१ धावा केल्या, तर मंधाना ४३४ धावा करून दुसऱ्या स्थानावर राहिली.
गोलंदाजांमध्ये दीप्ती सर्वात पुढे
भारताची स्टार ऑफ-स्पिनर दीप्ती शर्मा स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली. अंतिम सामन्यापूर्वी दीप्तीने १७ विकेट घेतल्या होत्या आणि ती या यादीत संयुक्तरीत्या पहिल्या स्थानावर होती. पण अंतिम सामन्यात तिने ५ बळी घेत आपल्या विकेटची संख्या २२ वर नेली.
दीप्ती व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या एनेबेल सदरलंडच्या नावावरही 17 विकेट होत्या आणि तीही या शर्यतीत होती, परंतु ऑस्ट्रेलियाचा प्रवास उपांत्य फेरीतच संपला. त्यामुळे दीप्तीला सर्वांना मागे टाकण्यात यश आले.
