पाकिस्तानसोबत वाढत्या तणावामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित

बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय

पाकिस्तानसोबत वाढत्या तणावामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित

जम्मू- काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव जबरदस्त वाढला आहे. पाकिस्तानकडून हल्ले केले जात असून भारताकडून याला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. अशातच आता इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ ही क्रिकेट स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. जम्मू आणि पठाणकोटच्या जवळच्या भागात हवाई हल्ल्याच्या अलर्टमुळे धर्मशाळेत पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना गुरुवारी अर्ध्यावरच रद्द करण्यात आला होता. यानंतर एका दिवसातचं हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी यासंदर्भात बैठक घेतली. स्पर्धेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आपत्कालीन बैठकीनंतर आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि चाहत्यांच्या सुरक्षेला प्राथमिकता देत हा निर्णय घेण्यात आला आहे.

पीटीआयने यासंदर्भातील वृत्त बीसीसीआयच्या सूत्रांनी दिले आहे. वृत्तानुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घडामोडींची पुष्टी करताना म्हटले आहे की, “देशात युद्धजन्य परिस्थिती असताना क्रिकेट सुरू राहणे चांगले वाटत नाही.” या निर्णयामुळे आता आयपीएल स्पर्धेचे पुढील सामने स्थगित करण्यात आले असून अनिश्चित काळासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

यापूर्वी, गुरुवारी (८ मे) रोजी धर्मशाला येथे सुरू असलेला पंजाब विरुद्ध दिल्लीचा सामना पाकिस्तानकडून झालेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे मध्यावरचं स्थगित करण्यात आला. सर्व खेळाडू, अधिकारी आणि चाहत्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. यानंतर उर्वरित स्पर्धेचे काय असा प्रश्न विचारला जात असताना आता बीसीसीआयने हा मोठा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा :

जम्मू- काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; सात दहशतवादी कंठस्नान

पाकचा खरा चेहरा उघड; आंतरराष्ट्रीय भागीदारांसमोर पसरले कर्जासाठी हात

पाकिस्तानी चौकी उडवली; भारतीय सैन्याने शेअर केला प्रतिहल्ल्याचा व्हिडीओ

वादग्रस्त विधानानंतर सोनू निगमचे गाणे कन्नड चित्रपटातून काढले

बुधवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने १५ भारतीय शहरांना लक्ष्य करून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा हल्ला सुरू केल्याने तणाव वाढला. जम्मू आणि काश्मीरमधील अवंतीपोरा आणि श्रीनगर; पंजाबमधील अमृतसर, जालंधर, लुधियाना, कपूरथला, आदमपूर आणि भटिंडा; चंदीगड; राजस्थानमधील नल, फलोदी आणि उत्तरलाई; आणि गुजरातमधील भूज ही प्रमुख ठिकाणे लक्ष्य करण्यात आली होती. प्रत्युत्तरादाखल, भारताने शुक्रवारी सकाळी प्रतिहल्ला सुरू केला. लाहोरजवळील पाकिस्तानी हवाई संरक्षण यंत्रणा भारताने उध्वस्त केली.

Exit mobile version