भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला मोठा धक्का बसला आहे. इस्रोची PSLV-C62 मोहीम अपयशी ठरली असून, १२ जानेवारी २०२६ रोजी श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतरही या मोहिमेत वाहून नेण्यात आलेले सर्व १६ उपग्रह नष्ट झाले आहेत.
२६० टन वजनाचा पीएसएलव्ही-डीएस प्रकारचे रॉकेट सकाळी १०.१७ वाजता आकाशात झेपावला. रॉकेटने पहिल्या दोन टप्प्यांमध्ये तसेच त्यांच्यातील विभाजन प्रक्रियेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. या टप्प्यांतील यशस्वी हालचालींमुळे देशभरातील प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
मात्र, तिसऱ्या टप्प्याच्या इंजिन प्रज्वलनानंतर अचानक मिशन कंट्रोलमध्ये शांतता पसरली. कोणतीही टेलिमेट्री माहिती मिळणे बंद झाले, ज्यामुळे उपग्रह कक्षेत स्थापित होण्यात अपयश आले असल्याचे स्पष्ट झाले. ही परिस्थिती मागील वर्षीच्या पीएसएलव्ही-सी ६१ मोहिमेतील अपयशासारखीच होती.
इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी या संदर्भात सांगितले, तिसऱ्या टप्प्याच्या शेवटी वाहनाची कामगिरी सुरुवातीला सामान्य होती. मात्र त्यानंतर रॉकेटच्या रोल रेटमध्ये गडबड आणि उड्डाण मार्गात विचलन आढळून आले. आम्ही सध्या संपूर्ण माहितीचे विश्लेषण करत आहोत आणि लवकरच अधिक तपशील देऊ.
हे ही वाचा:
जम्मू काश्मीरच्या सांबा, राजौरी, पूंछ जिल्ह्यांमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन
डोनाल्ड ट्रम्प बनले व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष? नेमकं प्रकरण काय?
शिवतीर्थावर आले भाऊ दोन, विकासावर मात्र मौन
‘लाडकी बहीण योजना’ अखंड सुरूच राहणार
या मोहिमेद्वारे संरक्षण संशोधन व विकास संस्थेचा (DRDO) EOS-N1 (अन्वेषा) हा सागरी पाळत ठेवण्यासाठीचा मुख्य उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार होता. त्यासोबतच १५ सह-उपग्रह होते. यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे प्रायोगिक पेलोड, खासगी कंपन्यांचे प्रयोग तसेच स्पेनचा KID री-एंट्री डेमॉन्स्ट्रेटर यांचा समावेश होता.
ही मोहीम ५०५ किलोमीटर उंचीच्या सन-सिंक्रोनस कक्षेत उपग्रह स्थापन करण्यासाठी आखण्यात आली होती. सॉलिड बूस्टरचे विभाजन यशस्वीरीत्या पार पडले, मात्र प्रक्षेपणानंतर सुमारे ८ मिनिटांनी तिसऱ्या टप्प्यातील बिघाडामुळे पुढील प्रगती थांबली.
ही समस्या पीएसएलव्ही सी ६१ मोहिमेतील चेंबर प्रेशर घटण्यासारखीच असल्याचे सांगितले जात असून, त्या वेळी ईओएस ०९ उपग्रह नष्ट झाला होता. इस्रोने रॉकेटचा उड्डाण मार्ग निश्चित मार्गापासून विचलित झाल्याची पुष्टी केली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी अपयशाचे विश्लेषण करणारी समिती स्थापन करण्यात येणार असून, सध्या अपयशाचे नेमके कारण जाहीर करण्यात आलेले नाही.
अपयशाची पुनरावृत्ती
अवघ्या आठ महिन्यांत PSLV ला दुसऱ्यांदा अपयश आले आहे. यामुळे ६३ यशस्वी मोहिमांमधून उभारलेली PSLV ची ९४ टक्के यशस्वीतेची परंपरा धोक्यात आली आहे. याच रॉकेटने यापूर्वी चांद्रयान-१ आणि आदित्य-एल१ यांसारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमा यशस्वी केल्या होत्या.
PSLV-C61 चा अंतिम अहवाल अद्याप सार्वजनिक न झाल्याने पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. आता सी ६२ मधील तिसऱ्या टप्प्यातील पुनरावृत्त बिघाडामुळे सॉलिड इंधन मोटरची विश्वसनीयता, नोजलमधील त्रुटी किंवा रॉकेटच्या आवरणातील मजबुती यासंबंधी गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. विशेषतः २०२६ मधील घाईगडबडीच्या प्रक्षेपण वेळापत्रकामुळे हे धोके वाढल्याचे मानले जात आहे.
व्यावसायिक व भविष्यातील परिणाम
NSIL मार्फत करण्यात येणाऱ्या व्यावसायिक राईडशेअर मोहिमांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रातील वाढीवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
सलग दोन अपयशांमुळे इस्रोच्या २०२६ साठी नियोजित १०० पेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपणांचे लक्ष्य, NavIC प्रणालीचा विस्तार, तसेच गगनयान मोहिमेची तयारी यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, विशेषतः खासगी आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्ध्यांच्या पार्श्वभूमीवर.
PSLV ची मॉड्युलर रचना लवकर दुरुस्ती व सुधारणा शक्य करते, असे तज्ज्ञांचे मत असले तरी, पारदर्शकतेचा अभाव राहिल्यास २०२५ प्रमाणेच संसदीय चौकशीचा दबाव वाढण्याची शक्यता आहे.
इस्रो अध्यक्ष व्ही. नारायणन यांच्या नेतृत्वाखालील टीमने लवकरच पुनरागमन करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, गरज भासल्यास एलएमव्ही ३ सारख्या पर्यायी प्रक्षेपकांचा विचार केला जाईल, असेही संकेत देण्यात आले आहेत. जागतिक पातळीवर भारताच्या अंतराळ क्षमतेकडे लक्ष लागले असताना, आत्मनिर्भरतेची भूमिका कायम ठेवण्याचा इस्रोचा निर्धार कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
