उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी ‘काकोरी ट्रेन कारवाई शताब्दी समारोहा’चा शुभारंभ करताना सांगितले की, काकोरीच्या घटनेला दरोडा म्हणणे म्हणजे क्रांतिकारकांच्या बलिदानाचे आणि त्यांच्या उद्देशाचे महत्त्व कमी करणे होय. क्रांतिकारकांचे एकमेव ध्येय भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करणे हे होते, असे त्यांनी सांगितले.
९ ऑगस्ट १९२५ रोजी काकोरीची ही ट्रेन ऍक्शन घडली. त्या दिवशी राम प्रसाद बिस्मिल यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांनी इंग्रजांचा खजाना हस्तगत केला. त्यात अशफाक उल्ला खान, राजेंद्रनाथ लाहिरी, चंद्रशेखर आझाद, ठाकूर रोशन सिंग यांचा समावेश होता. आझाद हे इंग्रजांच्या हाती सापडले नाहीत पण बाकीचे पकडले गेले आणि त्यांनी देशासाठी अत्युच्च बलिदान दिले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, इंग्रजांनी काकोरी ट्रेन कारवाईला ‘दरोडा’ म्हटले; मात्र दुर्दैवाने स्वतंत्र भारतात सत्तेवर आलेल्या लोकांनीही दीर्घकाळ याला ‘काकोरी दरोडा प्रकरण’ असे संबोधून क्रांतिकारकांचा सन्मान करण्याऐवजी त्यांचा अपमान करण्याचे काम केले. काकोरी आणि चौरी चौरा यांसारख्या घटनांनाही इतिहासात योग्य स्थान देण्यात आले नाही. काकोरी ट्रेन कारवाई ही केवळ इतिहासातील एक घटना नाही, तर देशातील तरुणांना राष्ट्रभक्ती, धैर्य आणि बलिदानाची प्रेरणा देणारा अध्याय आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून नव्या पिढीला स्वातंत्र्यलढ्यातील खऱ्या नायकांशी आणि त्यांच्या संघर्षाशी जोडणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, देशाचे स्वातंत्र्य हे एखाद्या एका व्यक्तीच्या किंवा एका विचारसरणीच्या प्रयत्नांचा परिणाम नव्हते. लाखो लोकांनी वेगवेगळ्या आघाड्यांवर संघर्ष केला आणि अनेक क्रांतिकारकांनी आपले सर्वस्व देशासाठी अर्पण केले. या बलिदानांना विसरणे म्हणजे देशाच्या युवा पिढीला तिच्या प्रेरणास्रोतांपासून दूर करण्यासारखे आहे.
हे ही वाचा:
भारतात मेटाची मनमानी चालणार नाही
भारत-पाक सीमेवर बीएसएफची मोठी कारवाई; संशयित घुसखोर ठार
सर्जरीच्या वेळी सोनू निगमने गायले रफींचे गाणे, व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्रातील ‘या’ ५ ऑफबीट ठिकाणांना एकदा नक्की भेट द्या!
चौरी चौरा घटनेचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगी म्हणाले की, त्या घटनेनंतर काँग्रेसने आपले आंदोलन स्थगित केले होते. त्यांनी सांगितले की, पंडित मदन मोहन मालवीय यांनी चौरी चौरा प्रकरणातील आरोपींचा खटला लढवला होता, तर काही स्थानिक नेत्यांनी क्रांतिकारकांविरोधात बाजू मांडण्यात भूमिका बजावली होती. स्वातंत्र्यानंतरही क्रांतिकारकांना त्यांना मिळायला हवा होता तो सन्मान मिळाला नाही, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
भारत अशाच प्रकारे गुलाम झाला नव्हता. देशाच्या गुलामगिरीमागे परस्परांतील फूट आणि भारताविरोधात रचलेले कटकारस्थानही जबाबदार होते, असे ते म्हणाले.
आजही जात आणि प्रदेशाच्या नावावर समाजात फूट पाडून भारताला कमकुवत करणाऱ्या शक्ती सक्रिय आहेत, असा दावा त्यांनी केला. समाजमाध्यमांनाही त्यांनी भारतविरोधी अपप्रचाराचे नवे माध्यम म्हटले. भारतविरोधी शक्ती त्याचा गैरवापर करत असून, समाजमाध्यमांच्या माध्यमातून अफवा पसरवून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या लोकांनी देशाच्या युवा पिढीला तिच्या क्रांतिकारी नायकांपासून दूर ठेवले, त्यांनी तरुणांवर सर्वांत मोठा अन्याय केला. एखाद्या तरुणाला आपल्या नायकांचा अभिमान बाळगण्याची संधी न देणे म्हणजे त्याला त्याच्या आदर्श आणि प्रेरणास्रोतांपासून दूर करण्यासारखे आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ देशात नाव देण्याचे राजकारणही एका कुटुंब आणि एका घराण्यापुरते मर्यादित राहिले. आता भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्रनिर्मितीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या देशातील नायकांचा सन्मान केला जात आहे.
