कर्नाटकची राजधानी बंगळूरू येथे मंगळवार (१० मार्च) रोजी हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद राहणार आहेत. ही बंदी बंगळूरू हॉटेल असोसिएशनने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यातील अडथळे आणि वाढलेल्या किंमतींच्या निषेधार्थ पुकारला आहे. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही या बंदला पाठींबा दर्शवला आहे. त्यांनी म्हटले की, केंद्र सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवल्यामुळे हॉटेल उद्योग कठीण परिस्थितीत सापडला आहे.
बंगळूरू हॉटेल असोसिएशनचे म्हणणे आहे की, सोमवारपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा अचानक थांबवण्यात आला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे. असोसिएशनचे मानद अध्यक्ष पी. सी. राव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, तेल कंपन्यांचे म्हणणे आहे की, पुढील ७० दिवस गॅस पुरवठ्यात कोणतीही अडचण येणार नाही, मात्र अचानक पुरवठा बंद केल्याने हॉटेल उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. पी. सी. राव म्हणाले, “आम्ही केंद्रीय मंत्रालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करून कमर्शियल गॅस सिलेंडर पुरवठ्यातील अडथळे दूर करावेत, अशी विनंती करतो.” गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबल्यामुळे बेंगळुरूमधील हॉटेल मंगळवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी पुढे सांगितले की हॉटेल या अत्यावश्यक सेवांमध्ये मोडतात आणि ते बंद राहिल्यास सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. नियमितपणे हॉटेलवर अवलंबून असलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच विविध वैद्यकीय सेवांशी संबंधित लोक या बंदमुळे प्रभावित होऊ शकतात.
दरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हॉटेल असोसिएशनच्या मागण्या योग्य असल्याचे सांगितले. त्यांनी नमूद केले की केंद्र सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत ₹११५ रुपयांची वाढ केली आहे, ज्यामुळे हॉटेल व्यवसायावर अतिरिक्त आर्थिक ताण पडला आहे. ते म्हणाले, “केंद्र सरकारने कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत ₹११५ रुपयांनी वाढवली आहे. त्यामुळे हॉटेल उद्योग अडचणीत आला आहे आणि त्यांनी बंदचे आवाहन करणे योग्य आहे.”
हॉटेल उद्योगाशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की गॅसच्या किंमतीत सातत्याने होणारी वाढ आणि पुरवठ्यातील अनिश्चितता यामुळे व्यवसाय चालवणे अधिक कठीण होत आहे. असोसिएशनने केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून पुरवठा पूर्ववत करावा आणि किंमतींच्या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. या बंदमुळे बेंगळुरूमध्ये एका दिवसासाठी हॉटेल आणि रेस्टॉरंट सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील दैनंदिन जीवनावर आणि बाहेर जेवणावर अवलंबून असलेल्या लोकांना गैरसोय होऊ शकते.
हे ही वाचा:
एलपीजी पुरवठ्यातील व्यत्ययामुळे मुंबईतील २०% हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद
चीनच्या स्टेल्थ फायटरला भारताचे ‘घातक’ उत्तर!
नवी दिल्लीहून मँचेस्टरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचा यु- टर्न!
चिनी रिफायनरीकडे रांगा, म्हणून भारताकडे याचना
दरम्यान, पश्चिम आशियामध्ये इराण विरोधात अमेरिका आणि इस्रायल यांनी छेडलेल्या संयुक्त युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. खाडी देशांवर इराणने केलेल्या हल्ल्यांमुळे जागतिक इंधन उत्पादनावर परिणाम झाला असून जगातील २० टक्क्यांहून अधिक इंधन पुरवठा मार्गांवर इराणी सैन्यामुळे अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे जगभरात गॅस आणि कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.
