भारताच्या वाघिनींनी जिंकले ३ विश्वचषक

भारताच्या वाघिनींनी जिंकले ३ विश्वचषक

२०२५ हे वर्ष भारतीय महिला क्रिकेट संघासाठी अत्यंत खास ठरले. या वर्षात भारताच्या मुलींनी तब्बल तीन विश्वचषक विजेतेपदे पटकावत इतिहास रचला. याशिवाय इंग्लंडच्या भूमीवरही भारतीय संघाने नवा अध्याय लिहिला. चला, या वर्षातील भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रमुख कामगिरीवर एक नजर टाकूया.


महिला वनडे विश्वचषक विजेतेपद

भारतीय संघाने श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध सुरुवातीचे दोन सामने जिंकले होते. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला.

यामुळे भारतासाठी स्पर्धेत टिकणे कठीण वाटत होते. पण न्यूझीलंडला ५३ धावांनी पराभूत करत भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियावर ५ विकेट्सनी मात करत भारताने अंतिम फेरी गाठली.

नवी मुंबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी पराभूत करत पहिल्यांदाच महिला वनडे विश्वचषकावर आपले नाव कोरले.


महिला ब्लाइंड क्रिकेट विश्वचषक

इतिहासात प्रथमच महिला ब्लाइंड क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आणि या स्पर्धेचे विजेतेपद भारताने पटकावले. भारतीय संघाने या स्पर्धेतील सर्व ७ सामने जिंकले.

अंतिम सामन्यात भारताने नेपाळला ७ विकेट्सनी पराभूत करत ऐतिहासिक कामगिरी केली.


अंडर-१९ टी-२० विश्वचषक

जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अंडर-१९ टी-२० विश्वचषकातही भारताच्या मुलींनी बाजी मारली.

गट फेरीत भारताने वेस्ट इंडिज, मलेशिया आणि श्रीलंका यांचा पराभव केला. सुपर सिक्स फेरीत बांगलादेश आणि स्कॉटलंडवर मात केली. उपांत्य फेरीत इंग्लंडला ९ विकेट्सनी हरवत भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ९ विकेट्सनी पराभूत करत भारताने ट्रॉफी आपल्या नावे केली.


आयर्लंडविरुद्ध वनडे मालिकेत क्लीन स्वीप

जानेवारी महिन्यात भारताने आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली. पहिला सामना ६ विकेट्सनी, दुसरा सामना ११६ धावांनी जिंकला.

तिसऱ्या सामन्यात भारताने तब्बल ३०४ धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. ही महिला वनडे क्रिकेटमधील धावांच्या फरकाने भारताची सर्वात मोठी विजयाची कामगिरी ठरली.


त्रिकोणी मालिकेतील विजय

श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वनडे त्रिकोणी मालिकेत भारताने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात श्रीलंकेवर भारताने ९७ धावांनी मात केली.


इंग्लंड दौऱ्यावर ऐतिहासिक यश

जून-जुलै दरम्यान भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. या दौऱ्यात भारताने ३-२ ने टी-२० मालिका आणि २-१ ने वनडे मालिका जिंकली.

इंग्लंडच्या दौऱ्यावर मर्यादित षटकांच्या दोन्ही मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती.

Exit mobile version