‘जया नाही शास्त्रप्रतीती जे नेणती कर्ममुद्रेची स्थिती तयालागि मर्हाटीया युक्ती केली ग्रंथरचना’कवी मुकुंदराज यांनी ‘विवेकसिंधू’ या आपल्या तत्त्वज्ञानात्मक ग्रंथरचनेतून जवळपास १००० वर्षपूर्वी केलेले वरील विवेचन आजच्या आधुनिक युगात देखील लागू होते.जगभरातील सुमारे १५ कोटी जनमानसाला एकत्र बांधून ठवणाऱ्या मराठी भाषेचा गौरव करताना कुसुमाग्रज म्हणतात, “भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा मग दिवा विझे.” अश्या प्रतिभावान कवींच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “कुसुमाग्रज” अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करताना ‘एआय’च्या युगात आपल्या मातृभाषेचा विचार करणे विशेष आवश्यक ठरते.
चॅट जी.पी.टी’ आणि आता ‘डीपसीक’ (आणि आता GROK-3) मुळे संपूर्ण जग ढवळून निघाले आहे. आधुनिक युगात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अर्थात ‘एआय’ तंत्रज्ञानाने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडली आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान आणि इतर अनेक क्षेत्रांत ‘एआय’चा वापर वाढत आहे. या सर्व क्षेत्रांमध्ये मराठी भाषेचा वापरदेखील महत्त्वपूर्ण ठरत आहे. मराठी ही एक समृद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची भाषा आहे. जगामध्ये बोलल्या जाणार्या भाषांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात मराठी ही १३ वी भाषा आहे, तसेच ती भारताच्या संविधानाच्या आठव्या अनुसूचित असणार्या २२ भाषांपैकी एक आहे.
‘ए.आय’च्या युगात मराठी भाषेचा वापर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक सुकर आणि प्रभावी होऊ शकतो. उदाहरणार्थ, आजकाल स्मार्टफोन आणि संगणक वापरून मराठीतून सहज संवाद साधता येतो. ‘गुगल सहायिका’, ‘अलेक्सा’, ‘सिरी’ यांसारख्या आवाज साहाय्यकांची मराठीतून सेवा उपलब्ध आहे. हे तंत्रज्ञान लोकांना मराठी भाषा वापरून कामे पूर्ण करण्यास मदत करत आहे. ‘एआय’च्या मदतीने मराठीमध्ये भाषेचा अनुवाद, लेखन, संवाद आणि विविध प्रकारच्या कार्ये केली जात आहेत. ‘चॅटबॉट’मध्येसुद्धा मराठी खूप प्रमाणात येऊ लागले आहे. तसेच, समाजमाध्यमांवर देखील मराठी वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘इन्स्टाग्राम’ यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर मराठीतून माहिती, विचार आणि भावना व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे लोकांच्या संवादाची भाषा समृद्ध झाली आहे. ‘एआय’च्या साहाय्याने मराठीमध्ये लेखन, संपादन आणि सुधारणा अधिक सुलभ झाल्या आहेत. अनेक ऑनलाईन टूल्स आणि अॅप्स मराठीत उपलब्ध आहेत. त्यामुळे मराठी लेखकांना आपली कला सादर करणे अधिक सोपे झाले आहे.
‘एआय’च्या मदतीने, भाषेच्या विविध रूपांचे दस्तऐवजीकरण करून काव्य, साहित्य आणि संवादाच्या इतर प्रकारांना डिजिटल स्वरूपात रूपांतरित करता येईल. विशेषतः ‘जेन बिटा’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या २०२५ किंवा त्यानंतर जन्मलेल्या, अथवा त्याआधीच्या ‘जेन झी’ आणि ‘जेन अल्फा’ या पिढ्यांची मराठीशी नाळ जुळण्यासाठी भाषेची डिजिटल उपलब्धता फार महत्त्वाची ठरेल. मराठी भाषेच्या कोकणी, मालवणी, वर्हाडी, अहिराणी इत्यादी १२ बोलीभाषा आहेत. ‘एआय’चा वापर करून ग्रामीण-नागर किंवा बोलीभाषा-प्रमाणित या दोन्हींमधली दरी सांधण्याचे काम उत्तम होऊ शकेल.
निरंतर विकसित होणार्या ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या युगात, मराठी भाषेचा उपयोग नेहमीच नव्या आणि सर्जनशील पद्धतीने वाढवण्यासाठी संस्थात्मक पातळीवर प्रयत्न करावे लागतील. भारत सरकारने ‘भाषिणी’ हे २०२२ मध्ये तयार केलेले (भाषा इंटरफेस फॉर इंडिया) तंत्र अशा प्रयत्नांचे उत्तम उदाहरण आहे. त्यात ‘एनएलपी’ आणि ‘एआय’चा वापर करण्यात आला आहे. मराठी डिजिटल कंटेंटसाठी ‘एआय’ची ट्रेनिंग मॉडेल्स मोठ्या प्रमाणात बनवणे देखील आवश्यक आहे. त्यासाठी मराठी भाषेचे संरक्षण आणि संवर्धन करणे आणि त्याचबरोबर मराठीजनांनी तंत्रस्नेही बनणे गरजेचे आहे. यासाठी सरकारबरोबरच शैक्षणिक संस्था आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी पुढाकार घेतल्यास, ‘एआय’च्या युगात मराठी भाषा भारतातच नव्हे, तर जगभरात एक महत्त्वाची भूमिका बजावू शकेल.
वस्तुतः दीर्घकाळ भाषा जिवंत राहते, याचा अर्थ ती भाषा प्रवाही, परिवर्तनशील आणि भाषिक देवाणघेवाणीतून समृद्ध झालेली असते, असे मानून आपण अधिक परिपक्व दृष्टीकोणातून भाषेचा विचार करून पुढे जायला हवं. आधुनिकता आणि चिरंजीवी संस्कृतीची मार्मिक सांगड घालून आपल्याला विश्वगुरू पदापर्यंत मार्गक्रमण करायचे आहे. “माता, मातृभूमी आणि मातृभाषेचा आदर व सन्मान आपण केला तरच जग करेल,” हे आपल्याला सदैव ध्यानात ठेवावे लागेल. मराठी भाषा ही केवळ शासकीय कामकाजापुरती मर्यादित न राहता, ती लोक व्यवहारात अधिक समृद्ध आणि सर्वव्यापी व्हावी, यासाठी समाजानेही पुढाकार घ्यायला हवा. कोणतीही भाषा सततच्या वापराने आणि तिच्यात नवकल्पना प्रसवून वापरल्याने समृद्ध होते आणि दीर्घकाळ टिकते. या मराठी भाषा गौरव दिनी, आपण सर्वांनी शुद्ध, प्रभावी आणि व्यापक शासकीय मराठीचा अंगीकार करण्याचा संकल्प करू या !भविष्यात मराठी भाषेला अनेकविध बहुमान मिळतील. त्यासाठी आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान बाळगून आणि सतत सतर्क राहून तिचा उपयोग करावा लागणार आहे. ही प्रक्रिया दीर्घकालीन आणि अतिशय संथपणे चालणारी आहे. त्यात ‘पी हळद आणि हो गोरी’ असा उतावळेपणा करून चालणार नाही. अशा प्रकारे संथ तरी प्रवाही असणे, हेच भाषेचे सौंदर्य आहे. मराठीचे प्रवाहीपण वाढवायची जबाबदारी आपली आहे. त्या जबाबदारीकडे सकारात्मकतेने पाहून त्यासाठी व्यक्तिगत, सामाजिक आणि शासकीय अशा सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले, तर ‘अभिजाततेच्या वलयामागची जबाबदारी’ रुक्ष न वाटता ‘जनांचा प्रवाह होईल’ आणि आपण भाषिक दृष्ट्या अधिक समृद्ध होऊ. परंतु, या सगळ्यासाठी आपण आत्माभिमान जोपासण्याची आणि सकारात्मक प्रयत्न करण्याची गरज आहे.“वाणी ही भारतात तिसरी, जगात तेरावी असे अढळ तिचे स्थान, डर नसे तिज, देऊनी झुंज अमृतातही पैजा जिंकेन हा सार्थ अभिमान , करुनी वंदन, करुनी प्रणाम जगभर पोहचवुया तिचा सन्मान, जतन करूया आपल्या ज्ञानभाषेचे, उंचावू मराठीचे अभिजात स्थान !!”