भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत अखेर चित्र स्पष्ट झाले आहे. दोघांनीही रविवारी इंस्टाग्रामवर स्वतंत्र निवेदनं पोस्ट करून लग्न रद्द झाल्याची पुष्टी केली. दोघांचे लग्न २४ नोव्हेंबर रोजी सांगली येथे होणार होते.
इंस्टाग्रामवर पलाशने लिहिले आहे की, “मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि माझ्या वैयक्तिक नात्यात मागे हटत आहे. सध्या सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर प्रतिक्रिया देताना त्याने पुढे लिहिले की, लग्न पुढे ढकलण्यामागे मी स्मृतीला धोका दिला अशी जी अफवा पसरवली जात आहे, त्या पूर्णपणे निराधार आहेत. माझ्यासाठी अत्यंत पवित्र असलेल्या नात्यावर अशा आरोपांचे सावट पडणे मला फार वेदनादायी आहे.
हे माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस आहेत. समाज म्हणून आपण सत्यता तपासल्याशिवाय कुणावरही न्याय करण्यापासून दूर राहायला शिकलो पाहिजे. आपल्या शब्दांनी कुणावर किती खोल जखम होऊ शकते हे आपल्याला कधीच कळत नाही, असेही त्याने म्हटले आहे.
खोट्या आरोपांवर कायदेशीर कारवाई
पलाशने इशारा देताना म्हटले की, “माझ्या विरोधात पसरवल्या जाणाऱ्या खोट्या आणि बदनामीकारक मजकुरावर माझी टीम कठोर कायदेशीर कारवाई करणार आहे. त्याने त्याची साथ देणाऱ्यांचे आभारही मानले.
लग्नाबाबतचा संपूर्ण घटनाक्रम
या दोघांचे लग्न २४ नोव्हेंबरला सांगलीत होणार होते. त्याची सर्व तयारी पूर्ण झाली होती. काही दिवस आधीपासूनच लग्नाआधीचे विविध कार्यक्रमही सुरू झाले होते. हळद, मेहंदी यांचे फोटो, व्हीडिओ समोर येत होते. भारतीय महिला क्रिकेट संघातील अनेक खेळाडूही त्या सगळ्या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. त्याआधीच भारतीय संघाने विश्वचषक जिंकलेला असल्यामुळे त्याचा आनंदही खेळाडूंच्या चेहऱ्यावर झळकत होता.
हे ही वाचा:
पाकिस्तानात संवैधानिक दुरुस्ती विरोधात वकील एकत्र
जैन मुनींचा कबूतरखाना बंद करण्याला विरोध कायम
भारताचा आफ्रिकेवर ‘यशस्वी’ मालिकाविजय!
लग्न अचानक पुढे ढकलले
२४ नोव्हेंबरच्या सकाळी स्मृतीच्या मॅनेजरने घोषणा केली की स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने आणि त्यांना रुग्णालयात दाखल केल्याने लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे. त्याच दिवशी, पलाश आणि त्यांचे कुटुंब मुंबईला परतले. नंतर अशी माहिती आली की पलाशचीही प्रकृती ढासळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
पण आता दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियातून अनफॉलो केले आहे. त्यामुळे लग्न फक्त रद्द केलेले नाही, तर हे नातं आता संपले आहे. पलाशने “पुढे जाण्याचा” निर्णय जाहीर केला, तर स्मृतीनेही त्यांच्या नात्याबद्दल ‘अवांतर चर्चेला बळी न पडण्याचे’ आवाहन केले.
