मूकबधीर विद्यार्थ्यांसाठी उघडी केली बड्या कंपन्यांची दारे

टीच संस्थेचा दीक्षांत सोहळा, अमन शर्मांचा कौतुकास्पद उपक्रम

मूकबधीर विद्यार्थ्यांसाठी उघडी केली बड्या कंपन्यांची दारे

टीच (TEACH) या संस्थेच्या माध्यमातून मूकबधिरांसाठी पदवी अभ्यासक्रम घेण्यात येतो. त्याअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी पदवी मिळविली त्यांचा दीक्षांत समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला. आता या मुलांसाठीही बड्या कंपन्यांची दारे उघडी झाली आहेत, हे विशेष. हा करिष्मा केलाय अमन शर्मा या तरुणाने.

दहा वर्षांपूर्वी जे.पी. मॉर्गन सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीतून नोकरीचा राजीनामा देऊन बाहेर पडायचं आणि मूकबधिर मुलांच्या उच्च शिक्षणासाठी कोर्स डिझाईन करायचे, त्यांना शिकवायचं, सक्षम करायचं, या उद्दिष्टासाठी आयुष्य वेचण्याचा निर्धार अमन शर्मा या तरुणाने केला आणि त्यात त्याने कौतुकास्पद यशही मिळविले. अमन शर्माच्या टीच या संस्थेच्या माध्यमातून अशा अनेक मूकबधिर तरुणांना उच्च शिक्षण देऊन बड्या कंपन्यांमध्ये चांगली नोकरी मिळेल या दृष्टीने तयार केले गेले. भविष्यात मूकबधिरांसाठी विद्यापीठ स्थापन करण्याची त्याची योजना आहे. अशा मुलांसाठी सुरू केलेल्या या संस्थेचा दीक्षांत सोहळा नुकताच पार पडला. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

यासंदर्भात अमन शर्मा यांनी सांगितले की, टीच संस्थेच्या माध्यमातून दोन कोर्स घेतो. एक आहे चार तासांचा ओरिएन्टेशन कोर्स, दुसरा कोर्स आहे २७० तासांचा. हे दोन्ही सर्टिफिकेट कोर्स आहेत. ते टीच या संस्थेच्या माध्यमातून घेतो. महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि महाविद्यालयात मूकबधीर मुलांच्या पदवीची व्यवस्था व्हायला हवी. त्यांच्यासाठी प्राध्यापकांचीही व्यवस्था व्हायला हवी.

अमन शर्मा म्हणाले की, आज ‘टीच’ च्या मुंबई कॅम्पसमधील ७० हून अधिक मूकबधीर विद्यार्थ्यांनी केवळ विद्यापीठाची पदवीच प्राप्त केली नाही, तर त्याहूनही महत्त्वाची अशी एक मोठी उपलब्धी मिळवली ती म्हणजे पदवीधर झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगार मिळाला आहे.

हे ही वाचा:

स्पेनला मोठा दिलासा; लामिन यामाल पूर्णपणे फिट!

लॉर्ड्सवर रोहित शर्माची अग्निपरीक्षा

बाप्पा, यंदा गावाला कसं येऊ?

अंतिम फेरीत मेस्सीसमोर ५ ऐतिहासिक विक्रमांचे लक्ष्य!

ज्या समुदायासाठी उच्च शिक्षण आणि अर्थपूर्ण करिअरच्या संधी आजही आव्हानात्मक आहेत, त्यांच्यासाठी हा केवळ पदवीदान समारंभ नाही. हा जिद्दीचा, चिकाटीचा आणि अमर्याद शक्यतांचा उत्सव आहे.
प्रत्येक पदवी प्रमाणपत्रामागे अनेक वर्षांची मेहनत, संघर्ष आणि सातत्य दडलेले आहे. प्रत्येक नोकरीची संधी ही विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाची, गुणवत्तेची आणि सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्थेच्या सामर्थ्याची साक्ष आहे, असेही अमन शर्मा म्हणाले.

या कार्यक्रमात बोलताना आमदार भातखळकर म्हणाले की, ‘टीच’ या संस्थेचे अमन शर्मा यांनी आपल्या प्रयत्नांतून मूकबधीर मुलांना जीवनात आपल्या पायावर उभे राहण्याची जी प्रेरणा दिली ही खूप मोठी गोष्ट आहे. नावात ‘टीच’ असले तरी आपण कसे जीवन जगले पाहिजे, हे खरे तर आम्हाला शिकण्यासारखे आहे.

२०१६मध्ये दिव्यांग कायदा सरकारने संमत केला आहे. मी स्वतः विधानसभेत या विषयावर काम करण्याचा प्रयत्न करतो. मूकबधीर मुलांसाठी बीएडचा कोर्स सुरू करण्याची इच्छा अमन शर्मा यांनी व्यक्त केली आहे. ऑटिझमच्या मुलांसाठी बीएडचा कोर्स सुरू करण्यात माझे योगदान आहे. त्यामुळे मी आश्वस्त करू इच्छितो की, तुम्ही जो सर्टिफिकेट कोर्स सुरू केला आहे. त्याला यूजीसीचीही मान्यता मिळाली आहे. मूकबधीर मुलांसाठी कॉलेजात बीएडचा कोर्स सुरू करण्याचे आश्वासन मी देतो. अशा मुलांना पदवी घेण्याची कोणतीही तरतूद नव्हती. तशी ती व्हावी यासाठी मी प्रयत्न करेन.
आपल्यासारख्या संस्थेला पालिकेच्या वतीने अत्यंत कमी दरात जागा उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यासाठीही मी प्रयत्न करीन, असेही आमदार भातखळकर यांनी सांगितले.

या विशेष सोहळ्यात उपस्थित राहून आमच्या पदवीधरांचा हा महत्त्वाचा टप्पा साजरा केल्याबद्दल आणि त्यांच्या आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी प्रेरणा दिल्याबद्दल आम्ही आमचे प्रमुख पाहुणे सुरेश बाबू वासुदेवन (एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी), आमदार अतुल भातखळकर आणि टीच चे सल्लागार मंडळ सदस्य एस. राधाकृष्णन यांचे आभारी आहोत.

Exit mobile version