बोरिवलीच्या मागाठाणे मेट्रो स्टेशनच्या बाजूलाच सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामांमुळे नागरिकांच्या डोक्याचा ताप दिवसेंदिवस वाढतोच आहे. येथील सर्व्हिस रोडवर उभे राहणारे ट्रक्स, मिक्सर, सळ्या घेऊन येणारी अवजड वाहने, खणलेले रस्ते यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. हा सर्व्हिस रोडही त्यामुळे वाईट अवस्थेत आहे. तिथे साचणारे पाणी, त्यामुळे चालण्यासाठी नसलेली जागा यामुळे पादचाऱ्यांना मनस्ताप होत आहे.

मागाठाणे स्टेशनपासून चालताना पादचाऱ्यांना या सगळ्या त्रासाला सामोरे जावे लागते. यासंदर्भात वारंवार तक्रारी केल्या जात असतानाही त्यावर ठोस कारवाई होत नाही. उद्या एखादा अपघात झाल्यावरच कारवाई होणार का, असा सवाल लोक विचारत आहे. याबाबत मनसेने आंदोलन करत याविरोधात आवाज उठविला आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि युवा नेते अमित ठाकरे यांच्याशी चर्चा करून मनसेचे युवा नेते मिलिंद घाग यांनी इथे आंदोलन करत सर्वसामान्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल संताप व्यक्त केला आणि हे जर थांबले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.
हे ही वाचा:
नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा जामीन रद्द; पुन्हा तुरुंगात जाणार
दिंडीतील वारकऱ्यांसाठी कारुळकरांचा महाप्रसाद
एचडीएफसी बँकेची दमदार कामगिरी!
एसटीचा प्रवास महागला! तिकीटदरात १३.५६% वाढ
मिलिंद घाग म्हणाले की, या अशा अवजड वाहनांमुळे इथे बजबजपुरी माजली आहे. लोकांना चालणेही मुश्किल झाले आहे. रस्त्यावरील या अवजड वाहनांमुळे फुटपाथही चालण्यालायक राहिलेला नाही. आपण एखादा अपघात इथे होईल याची वाट पाहतो आहोत का? यासाठी अनेक तक्रारी करूनही प्रशासनाला जाग कधी येणार? इथून जात असतानाच एका ट्रकमधून सळ्या उतरवताना दिसल्या म्हणून मी त्यांना विचारणा केली आणि सळ्या उतरविण्यास विरोध केला.
पोलिसांशीही संपर्क साधला आहे. याबाबत कस्तुरबा नगर पोलिस ठाण्यात रीतसर तक्रारही आपण करणार आहोत. मागाठाणे मेट्रो स्टेशनकडून येणारे रस्ते, इथे असलेली कॉलेजेस लक्षात घेता अपघाताला निमंत्रण देण्याची वाट पाहिली जात आहे का?







