महाराष्ट्रातील लाखो एसटी प्रवाशांना मोठा आर्थिक झटका बसला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) अखेर तिकीटदरात १३.५६ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर नवीन भाडेदर लागू होणार असून, दररोज एसटीने प्रवास करणाऱ्या सुमारे ५५ ते ६० लाख प्रवाशांना याचा थेट फटका बसणार आहे. डिझेलच्या वाढत्या किमती, कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांतील वाढ, वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा वाढलेला खर्च आणि महामंडळावरील आर्थिक ताण या सर्व कारणांमुळे ही भाडेवाढ अपरिहार्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
एसटी महामंडळाकडे सध्या सुमारे १४ हजारांहून अधिक बसगाड्यांचा ताफा असून, या बस दररोज राज्यभर हजारो फेऱ्या मारतात. मात्र गेल्या काही वर्षांत इंधनाच्या किमतीत सातत्याने झालेली वाढ, सुटे भाग, टायर, ल्युब्रिकंट्स आणि देखभाल खर्चात झालेली वाढ यामुळे महामंडळाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा अतिरिक्त भारही महामंडळावर पडला आहे. या पार्श्वभूमीवर महसूल वाढवण्यासाठी तिकीटदर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही वाचा:
आता पाकिटात येणार प्लास्टिकच्या नोटा!
अभिषेक बॅनर्जींचे पाच मजली कार्यालय करणार उद्ध्वस्त
ट्रम्पना ठार करणाऱ्याला १ कोटी डॉलर; इराणसमर्थित गटाची घोषणा
अंडी-चिकन महागले; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका!
या निर्णयामुळे राज्यभरच्या सर्व प्रकारच्या एसटी सेवांचे भाडे वाढणार आहे. यापूर्वी साध्या बससाठी लागू करण्यात आलेली १० टक्क्यांची हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात येणार असून, तिच्या जागी १३.५६ टक्क्यांची एकसमान भाडेवाढ लागू होईल. त्यामुळे कमी अंतराच्या प्रवासापासून लांब पल्ल्याच्या प्रवासापर्यंत प्रत्येक प्रवाशाला अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. उदाहरणार्थ, १०० रुपयांच्या तिकिटासाठी आता सुमारे ११४ रुपये, तर ५०० रुपयांच्या तिकिटासाठी जवळपास ५६८ रुपये मोजावे लागू शकतात.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, एसटीची सेवा अखंड सुरू ठेवण्यासाठी आणि महामंडळाची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता. वाढत्या खर्चामुळे महसूल आणि खर्च यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली असून, ती भरून काढण्यासाठी भाडेवाढीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. वाढीव महसुलातून बसची देखभाल, नवीन बस खरेदी, प्रवाशांसाठी अधिक सुविधा आणि सेवा सुधारण्यासाठी निधी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मात्र, या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता रोजच्या प्रवासासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे. विशेषतः विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला आणि नोकरीसाठी दररोज एसटीने प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांच्या मासिक प्रवास खर्चात लक्षणीय वाढ होणार आहे. त्यामुळे एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या उद्देशाने घेतलेला हा निर्णय महामंडळासाठी दिलासादायक असला, तरी सामान्य प्रवाशांच्या खिशाला मात्र मोठी झळ बसणार आहे.







