दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या २० दिवसांपासून आमरण उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी (१८ जुलै) पहाटे दिल्ली पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि न्यायालयाच्या निर्देशांनुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हलवताच जंतर-मंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विरोधकांनी या कारवाईवर तीव्र आक्षेप घेत सरकार आणि प्रशासनावर निशाणा साधला आहे.
सोनम वांगचुक हे नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुट प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या माध्यमातून आमरण उपोषण करत होते. २० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. आंदोलनकर्त्यांच्या माहितीनुसार, या काळात त्यांचे वजन घटले असून शरीरातील स्नायूही कमकुवत झाले आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
दिल्ली पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत होते. वैद्यकीय तज्ज्ञांनी आरोग्याची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगितल्यानंतर त्यांना अत्यावश्यक उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कारवाईदरम्यान काही आंदोलनकर्त्यांनी विरोध केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दुसरीकडे, आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर जबरदस्तीने वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्याचा आरोप केला आहे. काही कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना आणि आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांना धक्काबुक्की व मारहाण झाल्याचाही दावा केला. पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळत संपूर्ण कारवाई कायदेशीर आणि वैद्यकीय गरज लक्षात घेऊन करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
‘भारत माता नाही, आरएसएस माता’ म्हणणाऱ्याला टीव्ही चर्चेदरम्यानच चपलेने मारले
फायनलपूर्वी स्पेनची धाकधूक! यामल-पोरोच्या फिटनेसने वाढवली चिंता
पश्चिम रेल्वेवर रविवारी वसई रोड–वैतरणा दरम्यान मध्यरात्री जम्बो ब्लॉक
या घटनेनंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला अशा पद्धतीने हटविणे योग्य नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना शांतता राखण्याचे आणि कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, सफदरजंग रुग्णालयात सोनम वांगचुक यांच्यावर डॉक्टरांचे पथक उपचार करत असून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. त्यांच्या आरोग्याबाबतचा पुढील वैद्यकीय अहवाल येण्याची प्रतीक्षा आहे.







