तृणमूल काँग्रेसचे (TMC) राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील आमतला येथील कार्यालयावर शनिवारी (१८ जुलै) बुलडोझर कारवाई करण्यात आली. हे कार्यालय बेकायदेशीरपणे उभारण्यात आल्याचा आरोप करत स्थानिक प्रशासनाने ही कारवाई सुरू केली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, संबंधित कार्यालयाला यापूर्वी अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, निर्धारित कालावधीत समाधानकारक उत्तर किंवा आवश्यक कागदपत्रे सादर न झाल्याने अखेर बुलडोझरद्वारे पाडकामाची कारवाई सुरू करण्यात आली. त्यांचे पाच मजली कार्यालय पाडण्यासाठी तीन बुलडोझर कार्यरत आहेत. कारवाईदरम्यान परिसरात मोठ्या संख्येने पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, या कारवाईवर अभिषेक बॅनर्जी यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी प्रशासनाकडे अधिक वेळ मागितल्याचे सांगितले जात आहे. त्यांचा दावा आहे की, संबंधित बांधकामाबाबत आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत मिळायला हवी होती. प्रशासनाने मात्र नियमानुसारच कारवाई केल्याचा दावा केला आहे.
या कारवाईमुळे पश्चिम बंगालमधील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. विरोधकांनी ही कारवाई कायद्याची अंमलबजावणी असल्याचे म्हटले असले, तरी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी यामागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा आरोप केला आहे. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे विशेष लक्ष लागले आहे.
हे ही वाचा:
अंडी-चिकन महागले; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका!
मोदींच्या आवाहनालाही छेद! सोन्याचे दर घसरताच खरेदी पुन्हा वाढली
‘विक्रम-1’ झेपावले; भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्राचे नवे पर्व
लॉर्ड्समधील सामना रोहितचा अखेरचा नाही!
यापूर्वीही कोलकाता महानगरपालिकेने अभिषेक बॅनर्जी, त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित मालमत्ता आणि त्यांच्या कंपनीशी निगडित काही इमारतींना कथित अनधिकृत बांधकामाबाबत नोटिसा बजावल्या होत्या. त्या प्रकरणानंतर आता आमतला येथील कार्यालयावर झालेल्या बुलडोझर कारवाईमुळे राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







