फेसबुकवरून मोदींचा व्हिडिओ गायब; मेटाने चूक मान्य करत दिले स्पष्टीकरण

घटनेची केंद्र सरकारकडून दखल

फेसबुकवरून मोदींचा व्हिडिओ गायब; मेटाने चूक मान्य करत दिले स्पष्टीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फेसबुकवरील व्हिडिओ काही काळासाठी हटवल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर मेटा कंपनीने अखेर स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. संबंधित व्हिडिओ चुकून हटवला गेला होता आणि तो आता पुन्हा उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे मेटाने स्पष्ट केले.

हा व्हिडिओ पंतप्रधान मोदी यांनी नुकताच सोशल मीडियावर शेअर केला होता. नीट (NEET) प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर देशातील तरुणांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी सेल्फी-स्टाइलमध्ये हा व्हिडिओ तयार केला होता. मात्र, सोमवारी पहाटे फेसबुकवर हा व्हिडिओ अचानक दिसेनासा झाल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. काही वापरकर्त्यांना या व्हिडिओवर “This content is unavailable due to a legal request” असा संदेशही दिसल्याचे समोर आले.

वाद वाढल्यानंतर मेटाच्या प्रवक्त्याने स्पष्टीकरण देताना सांगितले की, “हा व्हिडिओ चुकीने हटवला गेला होता. ही आमची चूक होती. ती तातडीने दुरुस्त करण्यात आली असून व्हिडिओ पुन्हा उपलब्ध करून देण्यात आला आहे.” कंपनीने या गैरसोयीबद्दल दिलगिरीही व्यक्त केली.

दरम्यान, या घटनेची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तांनुसार, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय मेटाच्या अधिकाऱ्यांना समन्स बजावण्याचा विचार करत असून, पंतप्रधानांचा अधिकृत व्हिडिओ कोणत्या कारणामुळे हटवण्यात आला, याबाबत स्पष्टीकरण मागितले जाऊ शकते.

हे ही वाचा:

जंतर मंतर आंदोलनात २८७३ गुन्हेगार

अमरनाथ यात्रेवरून परतणारी बस गांदरबलमध्ये उलटली

उमर खालिद, शर्जील इमामच्या समर्थनार्थ फलक; महिलेविरोधात एफआयआर

जंतर-मंतरवरील आंदोलनाला परवानगी होती, संसद मोर्चाला नाही

हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. नीट पेपरफुटी प्रकरणावर थेट भूमिका मांडत पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर काही काळासाठी व्हिडिओ हटवला गेल्याने सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. मेटाने मात्र ही कोणतीही जाणीवपूर्वक कारवाई नसून तांत्रिक त्रुटीमुळे झालेली चूक असल्याचे स्पष्ट केले आहे.

Exit mobile version