कोकणवासीयांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला आणि त्रासदायक ठरलेला मुंबई-गोवा महामार्ग अखेर पूर्णत्वाच्या मार्गावर आला असून, यंदाच्या पावसाळ्यात प्रवास ‘सुसाट’ होणार असल्याचा शब्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमात गडकरी उपस्थित होते. त्यांनी भाषण संपवलं, पण अचानक पुन्हा माईककडे परत येत त्यांनी अशी घोषणा केली की सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. राजकारण करायचं नव्हतं म्हणून आधी बोललो नाही, पण राणे साहेबांसमोर शब्द देतो… मे महिन्याच्या आधी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल आणि या पावसाळ्यात तुम्हाला त्रास होणार नाही, असं ठामपणे गडकरी म्हणाले.
इतकंच नाही, तर कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाचं कामही तब्बल ९० टक्के पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं. हा मार्गही मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आम्ही एक टनेलही बांधत आहोत, त्यामुळे प्रवास आणखी वेगवान आणि सुरक्षित होईल, असं सांगत त्यांनी विकासाचा वेग दाखवून दिला.
मात्र, या सगळ्यात एक वेगळीच गोष्ट गडकरींनी सांगितली. महामार्गाचं उद्घाटन होईल, पण त्याला ते स्वतः जाणार नाहीत! या प्रकल्पामुळे माझी खूप बदनामी झाली आहे, त्यामुळे उद्घाटनाला येणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. मात्र लगेचच हलक्या फुलक्या अंदाजात ते म्हणाले, देवेंद्रजींसोबत गाडीत बसून थेट मुंबईहून गोव्याला जाऊ आणि तिथून विमानानं नागपूरला जाऊ!
हेही वाचा :
जखमी अवस्थेतूनही मोज्तबा खामेनेई शांतता चर्चांमध्ये सहभागी
मुंबईतून ४५० बांगलादेशी नागरिक ताब्यात
भारताची देशांतर्गत LPG उत्पादन ६०% पर्यंत वाढ
या विधानामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला, पण त्यामागची भावना मात्र स्पष्ट होती — गेल्या काही वर्षांत नागरिकांना सहन करावा लागलेला त्रास गडकरी विसरलेले नाहीत.
नारायण राणेंबद्दल बोलताना गडकरी भावुकही झाले. राजकारणाच्या सुरुवातीपासून राणे साहेबांचा प्रवास पाहिला आहे. उतार-चढावातून ते पुढे गेले. निर्णय घेताना त्यांचा खंबीरपणा आणि स्पष्टवक्तेपणा हीच त्यांची ओळख आहे, असं म्हणत त्यांनी राणेंच्या नेतृत्वाचं कौतुक केलं.
एकंदरीत, वर्षानुवर्षे खड्डे, ट्रॅफिक आणि रखडलेलं काम सहन करणाऱ्या कोकणवासीयांसाठी ही बातमी म्हणजे दिलास्याचा श्वासच आहे. आता नजर लागली आहे ती मे महिन्याच्या शेवटावर… कारण त्यानंतरचा पावसाळा ‘सुसाट’ प्रवासाचा असणार आहे!
