मुंबईत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहर ठप्प झालं होतं. अनेक सखल भाग जलमय झाले, शाळकरी मुलं शाळा सुटल्यावर घरी परतताना अडकली. पण अशाच वेळी, माटुंगा पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता ही खरीच अभिमानास्पद ठरली.
डॉन बॉस्को शाळेची बस किंग्ज सर्कल येथे साचलेल्या पाण्यात बंद पडली. पावसाच्या पाण्यात बस अडकून राहिली आणि सहा विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला. ही गंभीर परिस्थिती लक्षात येताच माटुंगा पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मुलांना अक्षरश: खांद्यावर घेऊन पाण्याबाहेर काढलं आणि पोलीस ठाण्यात सुरक्षित आणलं.
याच ठिकाणी खरी संवेदनशीलता दिसली – मुलांची भीती कमी व्हावी म्हणून पोलिसांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या, खाऊ दिला आणि हसतमुखाने त्यांना धीर दिला. एवढंच नाही तर “तुम्ही आमचं कुटुंब आहात” हे जणू वागणुकीतूनच दाखवून दिलं.
या शौर्यपूर्ण आणि माणुसकी जपणाऱ्या कृतीचं नागरिकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही कौतुक केलं. झोन 4 च्या उपायुक्त रागसुधा आर यांनी माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी रवींद्र पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं विशेष अभिनंदन केलं.
मुंबई पोलिसांचा हा ‘मानवतेचा चेहरा’ पाहून प्रत्येक मुंबईकराचा उर अभिमानाने भरून आला आहे.
आज संपूर्ण महाराष्ट्र एकच आवाज देतोय –
“धन्यवाद पोलिसकाका… तुम्ही फक्त जीव वाचवला नाही, तर अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलंत..!”
