पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला कठोर इशारा दिला आहे. हा नवा भारत आहे, कुणाच्या अण्वस्त्रांच्या धमक्यांना घाबरत नाही. हा नवा भारत घरात शिरून मारतो, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. नरेंद्र मोदी हे मध्य प्रदेशातील धार येथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित करत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “पाकिस्तानहून आलेल्या दहशतवाद्यांनी आपल्या बहिणींचे-सुना-बायकांचे कुंकू पुसले होते. आम्ही ऑपरेशन सिंदूर करून दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. आपल्या शूर जवानांनी काही क्षणात पाकिस्तानला गुडघ्यावर आणले. अगदी कालच देश-विदेशाने पाहिले की पुन्हा एक पाकिस्तानी दहशतवादी रडत-रडत आपली कहाणी सांगत होता,” असे म्हणत नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर टीकास्त्र डागले.
भारतीय सेनेच्या शौर्याचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “१७ सप्टेंबर याचं दिवशी देशाने सरदार पटेल यांच्या फौलादी इच्छाशक्तीचे उदाहरण पाहिले होते. भारतीय सेनेने हैदराबादला असंख्य अत्याचारांतून मुक्त करून, त्यांचे हक्क सुरक्षित करून भारताचा गौरव पुन्हा प्रस्थापित केला होता. देशाची इतकी मोठी उपलब्धी, सेनेचे इतके मोठे शौर्य याची अनेक दशके कोणी आठवण ठेवली नाही. पण तुम्ही संधी दिली आणि आमच्या सरकारने १७ सप्टेंबरच्या हैदराबादच्या घटनेला अमर केले. भारताच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या या दिवसाला आम्ही हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे.”
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग; पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
पंतप्रधान मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे बुधवारी ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ आणि ‘आठवा राष्ट्रीय पोषण महिना’ अभियानाचा शुभारंभ केला. कौशल्य निर्माणाचे देवता भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्या कौशल्याने राष्ट्रनिर्माणात गुंतलेल्या कोट्यवधी बांधवांना मी विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी आदरपूर्वक प्रणाम करतो. ते पुढे म्हणाले, विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी एक मोठी औद्योगिक सुरुवात होत आहे. देशातील सर्वात मोठ्या इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कचे भूमिपूजन धार येथे झाले आहे. या पार्कमुळे भारताच्या वस्त्रोद्योगाला नवी ऊर्जा मिळेल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळेल. या टेक्सटाईल पार्कमुळे आपल्या तरुण मुला-मुलींना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार आहे.
