भारत आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या व्यापार वाटाघाटींच्या पार्श्वभूमीवर, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने संकेत दिले आहेत की, नवी दिल्लीहून होणाऱ्या आयातीवर सध्या लादण्यात आलेल्या ५० टक्के आयातशुल्कात (टॅरिफ) निम्म्याने कपात करण्याचा विचार अमेरिका करू शकते.
ऑगस्ट २०२५ मध्ये, अनेक देशांवर टॅरिफ लादण्याच्या मोहिमेत असताना ट्रम्प यांनी भारतातून होणाऱ्या आयातीवरील शुल्क ५० टक्क्यांपर्यंत दुप्पट केले होते. भारताचे रशियासोबत असलेले ऊर्जा संबंध हे त्यामागील कारण असल्याचे त्यांनी सांगितले होते. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेन्ट यांनी एका मुलाखतीत दावा केला की, भारतातील रिफायनऱ्यांनी रशियन तेलाची खरेदी मोठ्या प्रमाणात कमी केली आहे. याच कारणाचा दाखला देत अमेरिकेने मागील वर्षी ऑगस्टमध्ये भारतावर आयातशुल्क दुप्पट केले होते.
हे ही वाचा:
बांगलादेशच्या जमात-ए-इस्लामीशी अमेरिकेचे गुलुगुलु
कमाल आर खानने इमारतीत केला गोळीबार
तामिळनाडूत डीएमके नव्हे सीएमसी सरकार!
परकीय गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे शेअर बाजार कोसळला
“रशियन तेल खरेदी केल्यामुळे आम्ही भारतावर २५ टक्के टॅरिफ लावले होते. आणि भारतीय रिफायनऱ्यांकडून रशियन तेलाची खरेदी खाली आली आहे. हे आमच्यासाठी यश आहे,” असे बेसेन्ट यांनी शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या पोलिटिकोला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
ते पुढे म्हणाले की, भारतावर लादलेले टॅरिफ अद्याप लागू आहेत, मात्र ते हटवण्याची शक्यता आहे. “टॅरिफ अजूनही लागू आहेत. पण ते हटवण्याचा एक मार्ग नक्कीच असू शकतो,” असे बेसेन्ट यांनी सूचक विधान केले. ऑगस्ट २०२५ मध्ये ट्रम्प यांनी अनेक देशांवर टॅरिफ लावण्याची मोहीम राबवताना, भारताच्या रशियाशी असलेल्या ऊर्जा संबंधांचा हवाला देत भारतीय आयातीवरील शुल्क ५० टक्क्यांपर्यंत वाढवले होते.
बेसेन्ट यांच्या या विधानावरून भारत-अमेरिका व्यापार चर्चांमध्ये काही प्रमाणात प्रगती होत असल्याचे संकेत मिळतात. हे विधान अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी अलीकडे केलेल्या वक्तव्याच्या पूर्णपणे विरोधात आहे.
एका पॉडकास्ट मुलाखतीत लुटनिक यांनी दावा केला होता की, दोन्ही देशांमधील संभाव्य व्यापार करार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन न केल्यामुळे रखडला. मात्र भारताने हा दावा तात्काळ फेटाळून लावला. त्यानंतर अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत सर्जिओ गोर यांनी, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक वाटाघाटी अद्याप सुरू असल्याचे स्पष्ट केल्यानंतर पुन्हा एकदा आशा निर्माण झाली.
भारत–रशिया तेल व्यापार संपला आहे का?
बेसेन्ट यांच्या ताज्या विधानांमुळे भारतासाठी अमेरिकेच्या टॅरिफमध्ये कपात होण्याची शक्यता दिसत असली, तरी यामुळे भारत–रशिया ऊर्जा व्यापार नेमका कुठे उभा आहे, याबाबतही तर्कवितर्क सुरू झाले आहेत. नवी दिल्लीने मॉस्कोसह तेल व्यापार कमी केल्याचा दावा करणारे बेसेन्ट हे पहिले अमेरिकी नेते नाहीत.
ट्रम्प यांनी नोव्हेंबरमध्येही असाच दावा केला होता. भारताने रशियन तेलाची खरेदी “मोठ्या प्रमाणात थांबवली आहे,” असे त्यांनी म्हटले होते.
“भारतासोबतच्या व्यापार चर्चा चांगल्या सुरू आहेत. त्यांनी रशियाकडून तेल खरेदी मोठ्या प्रमाणात थांबवली आहे. पंतप्रधान मोदी माझे मित्र आहेत, आम्ही बोलतो. त्यांनी मला भारतात येण्याचे निमंत्रण दिले आहे. आम्ही तो प्रश्न सोडवू,” असे ट्रम्प म्हणाले होते.
मात्र भारत सरकारने अधिकृतपणे अशा कोणत्याही दाव्याची पुष्टी केलेली नाही. उलट, ऑक्टोबर २०२५ मध्ये ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींनी भारत रशियासोबतचा तेल व्यापार थांबवेल असे “आश्वासन” दिल्याचा दावा केला होता, तो भारताने फेटाळून लावला. अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे भारताने स्पष्ट केले होते.
