ई-२० पेट्रोलमध्ये क्लोराइड, पाण्याची भेसळ नाही!

देशभरात तपासणी; तेल कंपन्यांनी दावे फेटाळले

ई-२० पेट्रोलमध्ये क्लोराइड, पाण्याची भेसळ नाही!

इथेनॉलमिश्रित ई-२० पेट्रोलमध्ये मोठ्या प्रमाणात क्लोराइड आणि ओलाव्याची भेसळ असल्याच्या दाव्यांना सरकारी तेल कंपन्यांनी फेटाळून लावले आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांनी देशभरात केलेल्या व्यापक तपासणीत इंधनाच्या गुणवत्तेबाबत चिंतेचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. पुरवठा साखळीतील विविध टप्प्यांवर करण्यात आलेल्या यादृच्छिक तपासण्यांमध्ये ई-२० पेट्रोल निर्धारित गुणवत्तेच्या निकषांमध्ये असल्याचे आढळल्याचे कंपन्यांनी सांगितले.

भारत सरकारने पेट्रोलमध्ये मिसळल्या जाणाऱ्या इथेनॉलसाठी क्लोराइडच्या प्रमाणाबाबत कठोर निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार रिफायनरी, इथेनॉल निर्मिती केंद्रे, साठवण केंद्रे, टर्मिनल आणि पेट्रोल पंप अशा संपूर्ण पुरवठा साखळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे. कंपन्यांनी गुणवत्तेची तपासणी अधिक कडक केली असून, प्रत्येक पेट्रोल पंपावर पाणी शिरले आहे का आणि इंधनाची घनता किती आहे, याची दिवसातून ८ ते १२ वेळा तपासणी केली जात असल्याचे सांगितले आहे. याशिवाय विविध ठिकाणी फिरती इंधन तपासणी प्रयोगशाळाही तैनात करण्यात आल्या आहेत. तपासणीचे निष्कर्ष मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमार्फत स्वतंत्रपणे पडताळले जात आहेत.

देशभरातील रिफायनरीमधून १०० हून अधिक पेट्रोल नमुने घेण्यात आले. या नमुन्यांमध्ये क्लोराइडचे प्रमाण १ पीपीएम किंवा त्यापेक्षा कमी आढळल्याचे तेल कंपन्यांनी सांगितले. यामुळे रिफायनरीमधून बाहेर पडणाऱ्या पेट्रोलची गुणवत्ता निर्धारित निकषांनुसार असल्याचा दावा कंपन्यांनी केला आहे.

इथेनॉल आणि ई-२० पेट्रोलची साठवणूक आणि वितरण होत असलेल्या केंद्रांवरही तपासणी करण्यात आली. देशभरातील तेल कंपन्यांच्या टर्मिनलमधून ८० हून अधिक नमुने घेण्यात आले. या नमुन्यांमध्येही क्लोराइडचे प्रमाण ३ पीपीएमपेक्षा कमी असल्याचे आढळले. पेट्रोल पंपांवरही तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

भारत-चीनवर टॅरिफची तलवार; १००% शुल्काचे विधेयक मंजूर

सलमान खानच्या घराबाहेर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाचा मृत्यू

बंगळुरूतील पंचतारांकित हॉटेल्समधून कालबाह्य दूध, खराब मांस जप्त

चीनच्या ‘मॅप वॉर’ला भारताचे प्रत्युत्तर; अरुणाचलमधील २७ ठिकाणांना अधिकृत ओळख

ई-२० पेट्रोलमध्ये ओलावा किंवा पाणी मिसळल्याच्या आरोपांवरही तेल कंपन्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. देशभरातील सुमारे ९० हजार पेट्रोल पंपांवरील भूमिगत साठवण टाक्यांची अनिवार्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. या टाक्यांची दिवसातून ८ ते १२ वेळा तपासणी केली जात असून, आतापर्यंत केलेल्या तपासणीत टाक्यांमध्ये पाणी शिरल्याचे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचे कंपन्यांनी सांगितले.

Exit mobile version