“कोणताही लॉकडाउन नाही, ‘टीम इंडिया’सारखे काम करायचे आहे…”

मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

“कोणताही लॉकडाउन नाही, ‘टीम इंडिया’सारखे काम करायचे आहे…”

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांसोबत व्हर्च्युअल बैठक घेतली. या बैठकीत देशाची तयारी, व्यापार स्थिरता, ऊर्जा सुरक्षा आणि पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की जागतिक परिस्थिती अत्यंत वेगाने बदलत आहे आणि त्यावर सतत लक्ष ठेवणे गरजेचे आहे. ३ मार्चपासून आंतर-मंत्रालयीन गट दररोज परिस्थितीचा आढावा घेत असून आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. या संकटाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि पुरवठा व्यवस्थेवर परिणाम होऊ नये, यासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
हे ही वाचा:
सायना नेहवाल: भारताचा ऑलिम्पिक अभिमान

सोनमर्ग महामार्गावर भीषण हिमस्खलन; ६ जणांचा मृत्यू

ऑलिम्पिक हिरो गुरजंत सिंगचा भावूक निरोप…

भारत-रशिया एलएनजी कराराची तयारी; हॉर्मुझ संकटात ऊर्जा सुरक्षेकडे मोठे पाऊल

बैठकीत आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. कोणत्याही प्रकारची साठेबाजी किंवा नफेखोरी सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट करत अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यास सांगितले. राज्य आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सक्रिय ठेवून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले.

पंतप्रधानांनी अफवा आणि चुकीच्या माहितीबाबतही इशारा दिला. नागरिकांमध्ये भीती पसरू नये यासाठी योग्य आणि अधिकृत माहिती वेळेवर देणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ऑनलाईन फसवणूक आणि बनावट एजंट्सपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले.

शेती क्षेत्राबाबतही महत्त्वाचे निर्देश देण्यात आले. आगामी खरीप हंगाम लक्षात घेता खतांच्या साठवणुकीवर आणि वितरणावर लक्ष ठेवण्यास सांगितले, जेणेकरून शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. तसेच सीमावर्ती आणि किनारपट्टी राज्यांना जहाज वाहतूक आणि आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत अधिक सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीत पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या उपलब्धतेवरही चर्चा झाली. केंद्र सरकारने स्पष्ट केले की देशात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि कोणतीही टंचाई नाही. तेल कंपन्यांनी पुरवठा वाढवला असून स्थानिक पातळीवर अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

या बैठकीत सर्व मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या उपाययोजनांचे स्वागत केले आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याचा विश्वास व्यक्त केला. “टीम इंडिया”च्या भावनेने केंद्र आणि राज्ये मिळून या आव्हानांना सामोरे जातील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

Exit mobile version