ऑपरेशन धराली: ३५७ नागरिकांचा जीव वाचवला, ८ जवान व सुमारे १०० नागरिक अद्याप बेपत्ता

ऑपरेशन धराली: ३५७ नागरिकांचा जीव वाचवला, ८ जवान व सुमारे १०० नागरिक अद्याप बेपत्ता

उत्तराखंडच्या धराली व हर्षिल परिसरात आलेल्या भीषण पूर व भूस्खलनानंतर भारतीय सैन्याने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन धराली’ अंतर्गत आतापर्यंत ३५७ नागरिकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी ११९ जणांना देहरादूनला एअर लिफ्ट करण्यात आले असून १३ जवानांचेही रेस्क्यू करण्यात आले आहे. मात्र, १४ राज रायफल्सचे ८ जवान आणि जवळपास १०० नागरिक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे.

रिलीफ ऑपरेशनचा वेग:
७ ऑगस्ट रोजी एकूण ६८ हेलिकॉप्टर उड्डाणे झालीत – यात भारतीय वायुसेनेच्या ६, लष्कराच्या ७ आणि नागरी हेलिकॉप्टरच्या ५५ उड्डाणांचा समावेश होता. सी-२९५ विमानाच्या माध्यमातून देहरादून, हर्षिल, मतली आणि धारासू दरम्यान हेलिब्रिजिंग सुरू आहे.

सैन्य, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आयटीबीपी, बीआरओ आणि स्थानिक प्रशासन यांचा एकत्रित बचाव प्रयत्न सुरु आहे. भारतीय सैन्याच्या पथकांबरोबरच वैद्यकीय पथकं, इंजिनीअर, शोधी श्वान, आणि डॉक्टर्सही मदतकार्यात सक्रिय आहेत. एनडीआरएफचे १०५ जवान आणि एसडीआरएफचेही दल तैनात आहे.

हर्षिल परिसर पूर्णतः रस्त्याने कापला गेला आहे. मात्र, लिमचिगाडपर्यंत रस्ता स्वच्छ करण्यात यश आले आहे. एक बेली ब्रिज बांधण्याचे काम प्रगतीपथावर असून शुक्रवार संध्याकाळपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

संचार व्यवस्था व मदत:
भारतीय सैन्याने हर्षिलमध्ये वाय-फाय व सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीसह नियंत्रण केंद्र स्थापन केले आहे. BSNL व Airtel कडून सेवा बहाल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खराब हवामानामुळे काही हेलिकॉप्टर उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.

वर्तमान स्थिती:
हर्षिल आणि आसपासच्या दुर्गम भागांमध्ये शोधमोहीम सुरू आहे. उर्वरित नागरिकांना हर्षिलहून मतली व देहरादूनकडे एअर लिफ्ट करण्यात येणार आहे.

भारतीय लष्कराने आश्वासन दिलं आहे की, कठीण भूभाग व प्रतिकूल हवामान असूनही २४ तास मदतकार्य सुरू राहणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सेना पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.

Exit mobile version