भारताने पाकिस्तानविरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वरून देशातील राजकारण अद्याप तापलेले असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताला “पहिल्याच दिवशी पराभव स्वीकारावा लागला” असा दावा त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, त्यांच्या विधानांवर विविध स्तरांतून तीव्र टीका केली जात आहे. काँग्रेसच्या सततच्या भारतीय सैन्याचा विरोध करणाऱ्या विधानांवरून ‘काँग्रेसला भारतीय सैन्याचा पराक्रम बघवत नाही.’ असा संदेश रूढ होत चालला आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑपरेशन सिंदूरवर भाष्य करताना, भारतीय सैन्याच्या भूमिकेवर आणि युद्धपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “अलीकडेच, ऑपरेशन सिंदूर दरम्यान, आम्ही पाहिले की सैन्य एक किलोमीटरही पुढे सरकले नाही. दोन-तीन दिवसांत जे काही घडले ते हवाई युद्ध आणि क्षेपणास्त्र युद्ध होते. भविष्यातही अशाच पद्धतीने युद्धे लढली जातील. अशा परिस्थितीत, आपल्याला खरोखरच १२ लाख सैनिकांची सेना असण्याची गरज आहे का, की आपण त्यांना दुसरे काही काम करायला लावू शकतो?”
याच अनुषंगाने त्यांनी सैन्याच्या संख्येचा मुद्दा उपस्थित करत पुढे म्हटले, “सैन्याच्या बाबतीत, आपल्याकडे १.२ दशलक्ष ते १.५ दशलक्ष सैनिक आहेत, तर पाकिस्तानकडे ५,००,००० ते ६,००,००० सैनिक आहेत. पण ही एवढी मोठी संख्येच्या सैन्याचे आपण करणार काय? आता तुमच्याकडे किती जमीनवर लढणारे सैन्य आहे याने काहीही फरक पडत नाही.” माजी मुख्यमंत्र्यांच्या या विधानवरून त्यांना सैन्यशक्ती, रणनीतिक स्थिती, संघर्षाचे उद्दिष्ट, सैन्याचा वापर यात फारशी गती नसल्याचे दिसून येते किंवा गती असूनही सोयीस्करपणे त्याकडे कानाडोळा केला गेला आहे.
त्यांच्या वक्तव्याचा सर्वाधिक वादग्रस्त भाग ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवसाबाबत करण्यात आलेल्या दाव्यांशी संबंधित आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टपणे म्हटले,“ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी भारतीय सैन्याचा पूर्णपणे पराभव झाला. ७ मे रोजी अर्धा तास चाललेली हवाई लढाई आपण गमावली. लोकांनी हे मान्य करो अथवा न करो, भारतीय विमाने पाडण्यात आली. हवाई दल पूर्णपणे जमिनीवर ठेवण्यात आले होते आणि एकही विमान उडाले नाही. जर ग्वाल्हेर, भटिंडा किंवा सिरसा येथून कोणतेही विमान उड्डाण केले असते तर पाकिस्तानने ते पाडण्याची शक्यता जास्त होती. यामुळे, हवाई दल पूर्णपणे जमिनीवर ठेवण्यात आले होते.”
या विधानांनंतर सत्ताधारी पक्षासह अनेक राजकीय नेत्यांनी आणि माजी संरक्षण अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. टीकाकारांचे म्हणणे आहे की अशा प्रकारची विधाने केवळ सरकारवर टीका न करता थेट भारतीय सैन्याच्या क्षमतेवर आणि मनोबलावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. विशेषतः अधिकृत संरक्षण सूत्रांकडून किंवा संसदीय चर्चेतून पुष्टी न झालेल्या दाव्यांमुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील बाबींवर सार्वजनिक संभ्रम निर्माण होऊ शकतो, असा आक्षेप घेतला जात आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून अद्याप या वक्तव्यांवर अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र ‘ऑपरेशन सिंदूर’वरून सुरू असलेला हा वाद आता केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांपुरता न राहता, लष्करी कारवाईवर सार्वजनिक चर्चेची मर्यादा काय असावी, यावरही व्यापक प्रश्न उपस्थित करत असल्याचे चित्र दिसत आहे.
काँग्रेसकडून भारतीय सैन्याच्या अपमानाची ही काही पहिलीच वेळ नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी बालाकोट एअर स्ट्राइकनंतर “एअर स्ट्राइकमध्ये दहशतवादी मारले गेले याचे पुरावे कुठे आहेत?” असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच मणिशंकर अय्यर यांनी “पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश आहे, त्याला चिथावू नका भारताने नम्र राहिले पाहिजे” अशी विधाने केली होती.
भारताने पाकिस्तानात घुसून पाकिस्तानला लोळवले. अशा सैन्याच्या पराक्रमावेळी गालबोट लावणे ही राहुल गांधी यांच्या अपयशी काँग्रेसची आता परंपराच बनली आहे. भारताने सर्जिकल स्ट्राइक आणि बालाकोट स्ट्राइक केल्यानंतर काँग्रेसकडून भारतीय सैन्याच्या पराक्रमाची साक्ष्य मागण्यात आली होती. स्वतः राहुल गांधी यांनी बालाकोटनंतर सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत लष्करी कारवाईच्या यशाबाबत शंका व्यक्त केल्याचा आरोपही विरोधक करतात.
जम्मू-कश्मीरचे माजी मंत्री सैफुद्दीन सोझ यांनी पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांवर, “पाकिस्तानच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायला हवा” असे विधान केले होते. २०२० साली गलवानच्या खोऱ्यात भारताचा चीनसोबत संघर्ष झाल्यानंतर चीनने भारताच्या अक्साईचीनचा भाग गिळण्याच्या भ्रामक बातम्या स्वतः कॉंग्रेसचे सुप्रीम नेते राहुल गांधी पेरत होते. राहुल गांधी यांचे भारतीय सैन्याचा अपमान करणाऱ्या “अरुणाचलमध्ये भारतीय सैन्याला चीनी सैन्य मारते आहे” या विधानावर आजही त्यांच्यावर टीका केली जाते.
राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याने सीमेवरील परिस्थितीची कल्पना नसताना लष्करी कारवायांवर प्रश्न उपस्थित करणे योग्य आहे का? त्यातही भारताशी शत्रुत्व घेतलेल्या देशाच्या बाजूने विधान करणे भारतीय सैन्याचा अपमान असल्याची चर्चा आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या काँग्रेस पक्षातील सुजाण मानल्या जाणाऱ्या नेत्याने असे विधान करणे हे कशाचे लक्षण म्हणावे. काँग्रेसचा जो घसरणारा स्तर आहे त्याचे हे द्योतक म्हटले पाहिजे. आपल्या देशाने ऑपरेशन सिंदूर दरम्यान कसा पराक्रम केला हे भारतातील सर्वपक्षीय खासदारांनी जगाला सांगितलेले असताना चव्हाण मात्र भारताच्या सैन्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. मग त्यांच्यात आणि सोशल मीडियावर असेच निरर्थक आरोप करणाऱ्यात आणि चव्हाण यांच्यात फरक तो काय?
