पंत चौथ्या सामन्यातून बाहेर, ईशान किशन पाचव्या टेस्टसाठी चर्चेत

पंत चौथ्या सामन्यातून बाहेर, ईशान किशन पाचव्या टेस्टसाठी चर्चेत

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातून भारताचा आक्रमक विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. पहिल्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात क्रिस वोक्सच्या एका वेगवान चेंडूने पंतच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर थेट आदळताच, तो तात्काळ दुखापतीसह मैदानाबाहेर गेला. स्कॅन रिपोर्टनुसार त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर असून, डॉक्टरांनी त्याला सहा आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

पंत झाला ‘रिटायर्ड हर्ट’, मैदान सोडताना रक्तस्राव
भारताच्या डावातील ६८व्या षटकात पंतने वोक्सवर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू चुकून त्याच्या पायाच्या आतील भागावर जाऊन जोरात लागला. काही वेळातच पाय सुजला, रक्तस्राव सुरू झाला आणि पंत श्वास रोखत, वेदनेत मैदानाबाहेर गेला. तोपर्यंत त्याने साई सुदर्शनसोबत ७२ धावांची भागीदारी करत ३७ धावा केल्या होत्या.

ईशान किशन होणार रिप्लेसमेंट?
पाचव्या कसोटीसाठी भारताकडून ईशान किशनला पंतच्या जागी संघात स्थान दिलं जाऊ शकतं, असं सूत्रांचं म्हणणं आहे. ईशानने आतापर्यंत २ कसोटी सामने खेळले असून, त्याने १*, २५ आणि नाबाद ५२ अशी फलंदाजी केली आहे. त्याचबरोबर ५ झेलही घेतले आहेत. तो गेल्यावेळी जुलै २०२३ मध्ये भारताकडून कसोटी खेळला होता.

साई सुदर्शन म्हणाला – “पंत खूप वेदनेत होता”
प्रेस कॉन्फरन्समध्ये साई सुदर्शनने सांगितलं, “पंत खूप छान फलंदाजी करत होता, पण त्याला खूप त्रास होत होता. त्याचं लगेच स्कॅन करण्यात आलं आणि नंतर ही गंभीर दुखापत समोर आली.”

भारत सीरिजमध्ये पिछाडीवर; आता ‘करो या मरो’ची स्थिती
भारत सध्या १-२ ने पिछाडीवर आहे. जर ही टेस्ट सिरीज जिंकायची असेल, तर पुढील दोन्ही सामने जिंकणं अत्यावश्यक ठरणार आहे. पंतसारख्या फलंदाजाचा संघाबाहेर जाणं, ही भारतासाठी फार मोठी हानी ठरणार आहे.

Exit mobile version