राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. लँडिंग दरम्यान हा भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अजित पवार हे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी म्हणून बारामती येथे जात होते. त्यांच्या प्रचारसभा होत्या यासाठी ते विमानाने जात होते. बारामती विमानतळाजवळ विमान लँडिंग होत असतानाच विमानाचा अपघात झाला आणि ते विमान जवळच्या शेतात कोसळले. माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हा अपघात भीषण स्वरुपाचा होता. हे विमान कोसळल्यानंतर हवेत मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले. तसेच विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात अजित पवारांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यासोबत असलेले कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकही जखमी झाल्याचे बोललं जात आहे. या सर्वांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
हे ही वाचा:
वडाळ्यात उभारली १५ फुटी तलवार; बिलाली फाउंडेशनचा उद्योग
पंडवानी गायिका प्रभा यादव, सुप्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस यांना भरतमुनी सन्मान
हिमालयाएवढ्या उंच महापुरुषांना छोटे करू नका रे!
युरोपीय युनियन सोबतच्या ‘मदर ऑफ ऑल ट्रेड डील’मुळे भारताला काय मिळणार?
अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्यानंतर ते गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येताच बारामतीसह संपूर्ण जिल्ह्यात चिंतेचे वातावरण असून कार्यकर्त्यांनी विमानतळ आणि रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. प्रशासनाकडून तूर्तास संयम राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विमानाच्या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड की अन्य काही कारण याचा तपास करण्यासाठी नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) कडून उच्चस्तरीय चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
