मुसळधार पावसाने मुंबईकरांना मागील दोन दिवसात चांगलेच हैराण केले असून, कुर्ला परिसरातील टीचर्स कॉलनी येथे राहणाऱ्या एका वयोवृद्ध दाम्पत्यावर मोठे संकट कोसळले. ९३ वर्षीय सी.एन. जॉर्ज आणि त्यांची ८५ वर्षीय पत्नी या पावसात पाण्यात अडकले असताना त्यांचा केअरटेकर त्यांना सोडून पळून गेला. मात्र कुर्ला पोलिसांनी तातडीने धाव घेत जॉर्ज यांचे प्राण वाचवले.
टीचर्स कॉलनी मिठी नदीलगत असल्याने मंगळवारी पहाटे नदीला पूर आला आणि परिसरात पाणी शिरले. तळमजल्यावर राहणाऱ्या जॉर्ज यांच्या घरात गुडघ्यापर्यंत पाणी भरले होते. वीजपुरवठा खंडित झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली. हृदयविकारग्रस्त जॉर्ज यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर त्यांची पत्नी मदतीसाठी शेजाऱ्यांकडे गेली. मात्र बाहेर कमरेएवढे पाणी असल्याने कोणीही वाहन आत येऊ शकत नव्हते.
शेवटी शेजाऱ्यांनी पोलिसांना कॉल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास म्हामुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण, दहशतवाद विरोधी पथकाचे हेड कॉन्स्टेबल सचिन शेलदरकर, विजय सूळ, सहाय्यक फोजदार चोपडे, कांबळे तसेच महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
हे ही वाचा:
तासभर रील्स पाहिल्यास डोळ्यांवर ताण
‘मतदार अधिकार यात्रा’: राहुल गांधींच्या ताफ्याने पोलिसाला चिरडले!
रंजू देवीने काँग्रेसचा ‘नावचोरी’चा बनाव आणला समोर
मुख्तार अब्बास नकवी यांचा राहुल गांधींवर निशाणा
पावसाच्या पाण्यातून वाट काढत, पोलिसांनी जॉर्ज यांना झोळी करून खांद्यावर उचलले. नागरिकांनी छत्र्या धरून मदत केली. अखेर पोलिसांनी जॉर्ज यांना आपल्या वाहनातून भाभा रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. त्यांच्या पत्नीची शेल्टर होममध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे.
या घटनेचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, कुर्ला पोलिसांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी देखील या कामगिरीची दखल घेत पोलिसांचे अभिनंदन केले.
