चिदंबरम यांनी विचारला उफराटा प्रश्न, म्हणे दहशतवादी पाकिस्तानातून आले होते काय?

भाजपा म्हणाली- पाकिस्तानला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न

चिदंबरम यांनी विचारला उफराटा प्रश्न, म्हणे दहशतवादी पाकिस्तानातून आले होते काय?

संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेच्या अगदी आधी, काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या एका विधानाने राजकीय वादळ निर्माण केले आहे. एका मुलाखतीत चिदंबरम यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि म्हणाले, हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी खरोखरच पाकिस्तानातून आले होते का? याचे पुरावे आहेत का?. ते असेही म्हणाले की, या हल्ल्यात देशांतर्गत दहशतवादी देखील सहभागी असू शकतात.

या विधानानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आणि ते नेहमीच शत्रूंची बाजू घेत असल्याचा आणि पाकिस्तानला क्लीन चिट देण्याचा आरोप केला. पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत म्हटले की, हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) काय काम केले आहे हे सरकार स्पष्ट करत नाही.
दहशतवाद्यांच्या ओळखीवरून प्रश्न उपस्थित 
चिदंबरम यांनी म्हटले की, त्यांनी (सरकारने) दहशतवाद्यांना ओळखले आहे का? ते पाकिस्तानातून आले आहेत हे निश्चित आहे का? यासोबतच, चिदंबरम यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेले नुकसान लपविल्याचा आरोपही केला. युद्धात दोन्ही बाजूंचे नुकसान होते. महायुद्धात ब्रिटनने दररोज आपले नुकसान जाहीर केले. भारतानेही असेच केले पाहिजे. सरकार सर्व काही लपवत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ते म्हणाले की, ते संसदेत ऑपरेशन सिंदूरवर बोलत नाहीत. पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करू शकतात, रॅलींमध्ये भाषणे देऊ शकतात, तर ते संसदेत का बोलत नाहीत? चिदंबरम यांनी असा आरोपही केला की भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीची घोषणा भारताने स्वतः केली नाही तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. सरकार यावर चर्चा करण्यास घाबरत आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, चिदंबरम यांच्या विधानावर भाजपानेही प्रतिक्रिया दिली. 

हे ही वाचा : 

मुंबई-म्हैसूर पोलिसांची संयुक्त कारवाई, म्हैसूरमध्ये १०० कोटींचे एमडीएमए जप्त

हेपाटायटिसविरुद्ध भारत ठामपणे पुढे

‘भारताचे सैनिक वाघ आहेत’

ऑपरेशन सिंदूरवर संसदेत राजनाथ सिंह काय म्हणाले ?

भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्सवर तीव्र हल्ला चढवला आणि म्हटले की चिदंबरम हेच नेते आहेत ज्यांनी भगव्या दहशतवादाचा खोटारडेपणा पसरवला. आता पुन्हा ते पाकिस्तानला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आरोप केला की प्रत्येक वेळी काँग्रेस पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर प्रश्न विचारण्याऐवजी त्याचे रक्षण करू लागते. मालवीय पुढे म्हणाले की जेव्हा जेव्हा भारत पाकिस्तानविरुद्ध कारवाई करतो तेव्हा तेव्हा काँग्रेस नेते इस्लामाबादच्या बचावात उभे राहतात. हे दुर्दैवी आहे.

भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, काँग्रेस नेहमीच पाकिस्तानसोबत उभी राहताना दिसते, मग ते मुंबई हल्ला असो किंवा सर्जिकल स्ट्राईक असो किंवा आता पहलगाम हल्ला असो. ते म्हणाले की, हा मुद्दा संसदेत प्रमुखतेने उपस्थित केला जाईल.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी देखील पी. चिदंबरम यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. दुबे म्हणाले, काँग्रेस आता देशद्रोही संघटना बनली आहे. राहुल गांधी यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षासोबत सामंजस्य करार केला आणि काँग्रेसचा देश विकण्याचा हेतू होता, मात्र पंतप्रधान मोदी आले आणि त्यांची योजना अयशस्वी झाली.
Exit mobile version