राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारला

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी उपराष्ट्रपती पदावरून जगदीप धनखड यांनी दिलेला राजीनामा स्वीकारला आहे. हा राजीनामा गृह मंत्रालयाकडे (एमएचए) पाठवण्यात आला असून, लवकरच यावर अधिकृत अधिसूचना जारी केली जाणार आहे. ही घोषणा राज्यसभेच्या कारवाईदरम्यान करण्यात आली, जेव्हा त्या वेळी सभापतींच्या आसनावर असलेले भाजप खासदार घनश्याम तिवारी यांनी माहिती दिली की, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.

त्यांनी सांगितले की, गृह मंत्रालयाने कळवले आहे की संविधानाच्या अनुच्छेद ६७ ए अंतर्गत भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तात्काळ प्रभावाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याआधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनखड यांना शुभेच्छा दिल्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पंतप्रधान मोदींनी लिहिले, जगदीप धनखड जी यांना भारताचे उपराष्ट्रपती आणि इतर अनेक भूमिकांमध्ये देशाची सेवा करण्याचा सन्मान मिळाला आहे. त्यांच्या उत्तम आरोग्याची मी प्रार्थना करतो.”

हेही वाचा..

फुफ्फुस विकारग्रस्तांना डॉ. दातार यांच्याकडून मदतीचा हात

मुंबईत विकली गेली १४,७५० कोटी रुपयांची लक्झरी घरे

पंतप्रधान मोदींनी उपराष्ट्रपती धनखड यांच्या सेवेचे केले कौतुक

ममता बॅनर्जी यांनी बंगाली भाषेच्या अस्मितेला ठेच दिली

पंतप्रधानांचे हे पोस्ट अशा वेळी आले आहे, जेव्हा विरोधक धनखड यांच्या अचानक राजीनाम्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. भारताचे १४ वे उपराष्ट्रपती असलेले जगदीप धनखड यांनी सोमवारी आरोग्याच्या कारणांचा दाखला देत राजीनामा दिला. राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात त्यांनी सांगितले की, आरोग्याला प्राधान्य देत ते तात्काळ प्रभावाने पद सोडत आहेत.

१६ जुलै २०२२ रोजी भाजपने एनडीएकडून धनखड यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार घोषित केले होते. ६ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या निवडणुकीत त्यांनी विरोधकांची उमेदवार मार्गरेट अल्वा यांचा ७१० पैकी ५२८ मतांनी मोठ्या फरकाने पराभव केला होता, जो १९९२ नंतर सर्वात मोठा विजय होता. उपराष्ट्रपती पदावर असताना ते राज्यसभेचे सभापती देखील होते. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण विधायी सत्रांचे संचालन केले आणि नियमपालनासाठी त्यांची भूमिका कठोर पण निष्पक्ष मानली गेली. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना सर्वच पक्षांमध्ये सन्मान आणि टीका दोन्ही मिळाले.

धनखड हे एक अनुभवी राजकारणी आणि संविधानाचे जाणकार म्हणून ओळखले जातात. गेल्या एका वर्षात त्यांच्या तब्येतीत अनेक वेळा बिघाड झाला होता आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले होते. अलीकडेच नैनीतालमध्ये त्यांच्यावर उपचार झाले. मात्र, त्यांच्या आजाराचे नेमके कारण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता देशात नव्या उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापतीही असतात आणि हे पद जास्त काळ रिक्त राहू शकत नाही.

Exit mobile version