‘शिवाजी विद्यापीठा’च्या नामांतरासाठी हिंदु जनजागृती समितीकडून आंदोलन

विद्यापीठाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करण्याची मागणी

‘शिवाजी विद्यापीठा’च्या नामांतरासाठी हिंदु जनजागृती समितीकडून आंदोलन

कोल्हापूरमधील ‘शिवाजी विद्यापीठा’च्या नामांतराची मागणी जोर धरत आहे. या विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराजांचे एकेरी नाव असल्याने हा मुद्दा उपस्थित केला जात असून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान असल्याने नामांतराची मागणी केली जात आहे.

कोल्हापूर येथील विद्यापीठाचे नाव ‘शिवाजी विद्यापीठ’ असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमितच छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे. त्यामुळे हा महाराजांचा अवमान असल्याचे म्हणत गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदु राष्ट्र- जागृती आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनामार्फत ‘शिवाजी विद्यापीठा’चे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करण्यात यावे अशी मागणी केली जाणार आहे. या आंदोलनात विविध मान्यवर त्यांचे मनोगत देखील व्यक्त करणार आहेत. या आंदोलनाला मोठ्या संख्येने लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटनचे सुनील कनवट यांनी म्हटले आहे की, ‘शिवाजी विद्यापीठा’चे नाव हे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असायला हवे. एकेरी उल्लेख करून अवमान केला जात आहे. या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना, गडप्रेमी संघटना, शिवप्रेमी संघटना एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत. पुरोगाम्यांच्या भूलथापांना बळी न पडता हे नाव बदलले पाहिजे, अशी मागणी केली जाणार आहे. तसेच विद्यार्थी, पोलीस, प्रशासनाने अहवाल सरकारकडे सादर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Exit mobile version