काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी वारंवार सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले आहे. विरोधी पक्ष नेत्याच्या सुरक्षा प्रोटोकॉल उल्लंघनाबद्दल चिंता व्यक्त करणारे हे पत्र सीआरपीएफ व्हीव्हीआयपी सुरक्षा प्रमुख सुनील जून यांनी लिहिले आहे. सीआरपीएफ प्रमुखांनी १० सप्टेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात राहुल गांधींवर सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन न करण्याचा आणि अनेकदा त्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सीआरपीएफचे व्हीव्हीआयपी सिक्युरिटी प्रमुख सुनील जून यांनी १० सप्टेंबर रोजी पत्र लिहिले आहे. पत्रात सीआरपीएफ व्हीव्हीआयपी सिक्युरिटी प्रमुखांनी राहुल गांधींच्या वागणुकीबद्दल तक्रार केली आहे. सुनील जून यांनी आरोप केला आहे की, राहुल गांधी हे त्यांची सुरक्षा गांभीर्याने घेत नाहीत. राहुल गांधींना झेड+ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे, ज्यामध्ये एव्हिएशन सिक्युरिटी लायझन (एएसएल) समाविष्ट आहे. ही देशातील सर्वोच्च सुरक्षा श्रेणी आहे. ज्यामध्ये सशस्त्र कमांडो, बुलेटप्रूफ वाहने आणि राज्य पोलिसांशी समन्वय यांचा समावेश आहे. परंतु, राहुल गांधी त्यांचे नियम, म्हणजेच सीआरपीएफचा ‘यलो बुक’ प्रोटोकॉल पाळत नाहीत, अशी तक्रार करण्यात आली आहे.
राहुल गांधींच्या वारंवार होणाऱ्या परदेश दौऱ्यांबद्दलही सीआरपीएफ प्रमुखांनी चिंता व्यक्त केली. या दौऱ्यांची माहिती त्यांच्या सुरक्षा पथकाला आगाऊ दिली जात नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या नऊ महिन्यांत राहुल गांधी यांनी सहा परदेश दौऱ्यांमध्ये सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केले. हे सर्व सहा परदेश दौरे सुरक्षा एजन्सीला माहिती न देता करण्यात आले होते, ज्यामुळे सुरक्षा एजन्सीला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले, असे पत्रात म्हटले आहे.
सुरक्षा प्रोटोकॉलनुसार, परदेश दौऱ्याच्या १५ दिवस आधी त्यांच्या सुरक्षा एजन्सीला माहिती देणे आवश्यक आहे, परंतु काँग्रेस नेते सुरक्षा पथकाला माहिती देण्यात अयशस्वी ठरत असल्याचे दिसून आले आहे. राहुल गांधी यांच्या अलिकडच्या मलेशिया दौऱ्याची भाजपने ‘उपाध्यक्षांच्या निवडणुकीदरम्यान सुट्टीचा प्रवास’ अशी खिल्ली उडवली होती, तर छायाचित्रांमध्ये ते कोणत्याही सुरक्षेशिवाय परदेशात फिरतानाही दिसले होते.
हेही वाचा..
नेपाळ सारखे जनआंदोलन भारतात व्हावं; तृणमूलचे आमदार बरळले
नेपाळ तुरुंगातून फरार ६० कैद्यांना सशस्त्र सीमा बलाने केली अटक!
मेंदू खाणाऱ्या अमीबामुळे आणखी एकाचा मृत्यू
सीआरपीएफच्या मते, गेल्या ९ महिन्यांत राहुल गांधींनी सहा वेळा सुरक्षा प्रोटोकॉल मोडला ते दौरे खालीलप्रमाणे
- ३० डिसेंबर २०२४ ते ९ जानेवारी २०२५ – इटली दौरा.
- १२ मार्च ते १७ मार्च – व्हिएतनाम दौरा
- १७ एप्रिल ते २३ एप्रिल – दुबई दौरा
- ११ जून ते १८ जून – दोहा, कतार दौरा
- २५ जून ते ६ जुलै – लंडन दौरा
- ४ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर – मलेशिया दौरा
