ईडन गार्डन्सवर सुरू असलेल्या भारत–दक्षिण आफ्रिका टेस्ट सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर सामना ठामपणे भारताच्या बाजूने झुकलेला दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात केवळ ९३ धावांत ७ विकेट्स गमावल्या असून त्यांची आघाडी सध्या फक्त ६३ धावा आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार टेंबा बावुमा २९ धावांवर (३ चौकार, ७८ चेंडू) टिकून आहेत. त्यांच्यासोबत कॉर्बिन बोश १ धावांवर खेळत आहे.
इतर फलंदाजांमध्ये रेयान रिकेल्टन (११), एडेन मार्करम (४), वियान मुल्डर (११), मार्को यान्सेन (१३) लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले.
स्पिन खेळपट्टीवर जडेजाची धमाकेदार गोलंदाजी
ईडन गार्डनवरील पिच स्पिनरसाठी स्वर्ग ठरत असून आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातील ७ पैकी ४ विकेट्स रवींद्र जडेजाने, २ कुलदीप यादवने, तर १ अक्षर पटेलने घेतली.
पहिल्या डावात ५ विकेट घेणारा जसप्रीत बुमराह या डावात मात्र wicketless राहिला.
भारताची पहिली कामगिरी
भारतीय संघ पहिल्या डावात १८९ धावांवर सर्वबाद झाला. शुभमन गिल मानेला दुखापत झाल्याने ‘रिटायर्ड हर्ट’ झाले.
केएल राहुलने ३९, वॉशिंग्टन सुंदरने २९, तर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजाने २७-२७ धावा केल्या. अक्षर पटेल (१६) आणि ध्रुव जुरेल (१४) यांनीही हातभार लावला.
दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात सायमन हार्मरने ४ विकेट्स, मार्को यान्सेनने ३, तर केशव महाराज आणि कॉर्बिन बोश यांनी १-१ विकेट घेतली.
आफ्रिकेची पहिली खेळी
दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात १५९ धावांत गडगडली. जसप्रीत बुमराहने ५, तर सिराज आणि कुलदीप यादवने २-२, अक्षर पटेलने १ विकेट घेतली.
