काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘वोट चोरी’चे केलेले आरोप निराधार असून त्यामागे कोणताही पुरावा नाही, असं शिवसेना नेते संजय निरुपम यांनी ठामपणे सांगितलं आहे.
शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय निरुपम म्हणाले, “महाराष्ट्रात महायुतीची विजय यात्रा ही जनतेच्या कौलाने झाली आहे. राहुल गांधींनी दावा केला की नव्या मतदारांची फसवणूक करून निवडणूक जिंकण्यात आली, पण ते म्हणता म्हणता कर्नाटकपर्यंत गेले!”
राहुल गांधी यांच्या ‘शामच्या वेळेस अचानक मतदान वाढलं’ या आरोपावर उत्तर देताना निरुपम म्हणाले, “संध्याकाळी साडेपाचनंतर मतदान टक्केवारी वाढणं ही सामान्य गोष्ट आहे. देशभरात अनेक वेळा हे घडलं आहे. कामावरून परतलेले मतदार बहुतेक वेळा संध्याकाळीच मतदान करत असतात.”
राहुल गांधींनी नागपूरच्या कामठी मतदारसंघाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर बोलताना संजय निरुपम म्हणाले, “माढा, वणी आणि श्रीरामपूर या तीन ठिकाणी देखील मतदान संध्याकाळी वाढलं होतं. पण त्या तिन्ही जागांवर महायुती नव्हे, तर NCP-SP, शिवसेना (UBT), आणि काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. मग तेथे ‘वोट चोरी’ कुठे झाली?”
त्यांनी पुढे म्हटलं, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिने आधी हा डाटा शेअर केला होता. पण काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी त्यावर एक शब्दही बोलला नाही. उलट आता निवडणुका जवळ आल्या की, ‘एटम बॉम्ब’ फोडण्याच्या नावाखाली बेछूट आरोप सुरू आहेत.”
