उबाठा शिवसेनेला महापौरपदाचे स्वप्न, शिंदेंचे नगरसेवक शिवसैनिक असल्याचा साक्षात्कार

खासदार संजय राऊत यांनी केला दावा

उबाठा शिवसेनेला महापौरपदाचे स्वप्न, शिंदेंचे नगरसेवक शिवसैनिक असल्याचा साक्षात्कार

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाचे ८९ नगरसेवक आणि एकनाथ शिंदे यांचे २९ नगरसेवक निवडून आल्यानंतर बहुमताचा आकडा पार केल्यावरही ठाकरेंच्या शिवसेनेला महापौरपद दिसत आहे. शिंदेंचे नगरसेवक आपल्याकडे येतील, असे सूचक वक्तव्य करून अजूनही उबाठा शिवसेना ही महापौरपदाच्या शर्यतीत असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, एकनाथ शिंदे यांचे निवडून आलेले नगरसेवक हे मूळचे शिवसैनिक आहेत आणि त्यांच्या मनात आजही शिवसेनेबद्दल वेगळी भावना आहे. नगरसेवकांना किती काळ कोंडून ठेवणार? त्यांच्या मनात मराठी अस्मितेची मशाल धगधगते आहे. भाजपाचा महापौर होऊ द्यायचा नाही, हे जवळपास सर्वांनी ठरवले आहे. जरी ते आज दुसऱ्या गटात असले, तरी संपर्काची विविध साधने वापरून आमच्यापर्यंत त्यांचे निरोप पोहोचत आहेत, असाही दावा संजय राऊत यांनी केला.

राज्यातील २९ महापालिकांच्या निकालांनंतर मुंबईत महापौर कोणाचा होणार याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अद्याप महापौरपदाचे आरक्षणही स्पष्ट झालेले नाही. भाजपला ८९ आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षाला २९ जागा मिळाल्यानंतर ११८ हा बहुमताचा आकडा महायुतीकडे आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचा महापौर बसणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यावर संजय राऊत म्हणतात की, मुंबईत भाजपाचा महापौर होऊ नये ही खुद्द एकनाथ शिंदेंच्या नगरसेवकांचीही सुप्त इच्छा आहे.

हे ही वाचा:

रविवार: सूर्यदेव देईल सकारात्मकता! ‘ही’ प्रार्थना कराच

विराट–कुलदीप महाकाल चरणी, भस्म आरतीत सहभागी

ग्रीनलँडवरून अमेरिका – युरोप आमनेसामने

धुरंधर राजकारणी

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले. मी या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांची भेट घेतली असून, त्यांच्यातही या विषयावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही तटस्थपणे हालचालींकडे पाहत आहोत, पण पडद्यामागे अनेक गोष्टी घडत आहेत. भाजपाकडे केवळ चारचेच बहुमत आहे आणि राजकारणात बहुमत हे पाऱ्यासारखे चंचल असते,” असा इशारा त्यांनी भाजपला दिला.

Exit mobile version