प्रसिद्ध ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे निधन झाले आहे. राम सुतार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राम सुतार यांनी जगभर २०० हून अधिक शिल्प बनवली आहेत. दिल्लीत संसद भवनाच्या प्रांगणात राम सुतारांनी साकारलेली शिल्प आहेत.
राम सुतार यांना पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण या सारख्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. राम सुतार यांचा हुबेहूब, जिवंत पुतळे उभारणीत हातखंडा होता. त्यांच्या शिल्पकृतीत मानवीय भाव सूक्ष्म आणि बोलके संदेश पाहायला मिळतात. राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत.
काही दिवसांपूर्वी अंदमान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं, तो पुतळा देखील राम सुतार यांनी साकारला होता. राम सुतार यांच्या पुतळ्यामधली कलाकुसर, त्यांच्या शिल्पामधली बारकाई हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या जाण्याने कला क्षेत्राचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. जगातील सर्वात उंच, १८२ मीटर उंचीचा स्टॅच्यू ऑफ युनिटी साकारल्यानंतर राम सुतार यांना जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळाली.
राम सुतार यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९२५ रोजी धुळे जिल्ह्यातील गोंडूर या गावात झाला. सुरुवातीला श्रीराम कृष्ण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिल्पकलेचे प्राथमिक धडे घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये औपचारिक शिक्षण पूर्ण केले. १९५९ साली राम सुतार यांनी दिल्लीत माहिती व दूरसंचार मंत्रालयात नोकरी स्वीकारली. मात्र काही वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा देत पूर्णवेळ शिल्पकार म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. शिल्पकलेतील प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांनी दिल्लीमध्ये स्वतःचा स्टुडिओ उभारला.
हेही वाचा..
‘इजू बाई’ ठरल्या देशाचा अभिमान
पीओकेमध्ये असंतोष; वारंवार वीज खंडित होत असल्याने जनता रस्त्यावर
विटभट्टीची चिमणी कोसळून तीन ठार
पहिल्या मिस इंडिया मेहर कॅस्टेलिनो यांचे निधन
राम सुतार यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण पुतळे साकारले. स्टॅच्यू ऑफ युनिटीचा संपूर्ण डिझाईन त्यांनीच तयार केला असून, हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि उल्लेखनीय कार्य मानले जाते. त्यांच्या कार्याची दखल घेत १९९९ साली पद्मश्री आणि २०१६ साली पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. सुमारे ६० वर्षांच्या कारकिर्दीत राम सुतार यांनी अनेक भव्य मूर्ती निर्माण केल्या. यामध्ये संसद भवनातील महात्मा गांधी यांच्या मूर्तीचा विशेष उल्लेख केला जातो.
