दूषित पाणी प्यायल्याने सात जण दगावले

मध्य प्रदेशातील घटना, १०० हून अधिक जण रुग्णालयात

दूषित पाणी प्यायल्याने सात जण दगावले

मध्य प्रदेशातील इंदूरमधील भागीरथपुरा भागात दूषित पाणी पिल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. १०० हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती इंदूरच्या महापौरांनी दिली आहे. या प्रकरणानंतर भगीरथपुरा येथील नागरी संस्थेतील एका झोनल अधिकाऱ्याला आणि एका सहाय्यक अभियंत्याला तात्काळ निलंबित कार्ण्यात्ब आले. एका प्रभारी उपअभियंत्याची सेवा रद्द करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केला आणि प्रत्येक शोकग्रस्त कुटुंबाला २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच बाधितांचा वैद्यकीय खर्च राज्य सरकार उचलेल, असे जाहीर करण्यात आले आहे. रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी शहर प्रशासनाने भगीरथपुरा रहिवाशांसाठी अरबिंदो रुग्णालयात १०० अतिरिक्त खाटा तयार केल्या आहेत.

आरोग्य विभागाने २,७०३ घरांचे सर्वेक्षण केले, सुमारे १२,००० व्यक्तींची तपासणी केली आणि सौम्य लक्षणे असलेल्या १,१४६ रुग्णांना प्राथमिक उपचार दिले. अधिक गंभीर आजार असलेल्या एकूण १११ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर १८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. माधव प्रसाद हसानी म्हणाले, दूषित पाणी पिल्यानंतर रुग्णांना उलट्या, अतिसार आणि डिहायड्रेशनचा त्रास झाला. अधिकाऱ्यांनी प्रयोगशाळेच्या चाचणीसाठी पाण्याचे नमुने गोळा केले आहेत, तर प्राथमिक मूल्यांकनात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात ड्रेनेजचे पाणी मिसळण्याची शक्यता असल्याचे दिसून आले आहे.

महानगरपालिका आयुक्त दिलीप कुमार यादव यांनी भागीरथपुरा येथील मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईनमध्ये गळती आढळून आल्याची माहिती दिली, जिथे पाईपवर एक शौचालय बांधण्यात आले होते. दूषित होण्याचे संभाव्य कारण म्हणून या समस्येची चौकशी केली जात आहे. महापौर भार्गव यांनी सांगितले की, पाण्याच्या पायाभूत सुविधांच्या देखभालीमध्ये निष्काळजीपणा दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

हे ही वाचा:

ख्रिसमसच्या सुट्टीत बँकेतून ३० दशलक्ष युरो लुटले; प्रकाण काय?

“ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचा नाश केला आहे”

नुसरत भरुचाने केले महाकाल दर्शन, मौलाना भडकले

मतदानापूर्वी भाजपचा पहिला विजय

२५ डिसेंबर रोजी पुरवण्यात आलेल्या पाण्याला वास येत असल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी स्थानिक नगरसेवक कमल बघेला यांनी अधोरेखित केल्या. हे पाणी पिल्यानंतर लोक आजारी पडले असतील. प्रयोगशाळेतील अहवालांवरूनच पाणी कसे दूषित झाले हे स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. दुर्गंधीयुक्त आणि विचित्र चवीच्या पाण्याबद्दल वारंवार तक्रारी करूनही महापालिका अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही, असा रहिवाशांचा आरोप आहे.

Exit mobile version