शांभवी थिटे
लोक “मोदी–शहा की कबर खुदेगी” अशा घोषणा ऐकून संताप व्यक्त करत आहेत. तो संताप चुकीचा नाही; पण दुर्दैवाने तो फक्त वरवरच्या घोषणांपुरताच मर्यादित राहतो आहे. प्रत्यक्षात प्रश्न हा एखाद्या घोषणेचा नसून, डाव्यांकडून सतत देशाच्या सार्वभौमत्वला दिल्या जात असलेल्या आव्हानाचा आहे.
२०१६ मध्ये उमर खालिद याने देशाचे तुकडे करण्याची तर २०२० साली शर्जील इमामने आसाम भारतापासून तोडण्याची आणि तथाकथित “चिकन नेकवर” फक्त मुस्लिमांचा हक्क आहे असे उघडपणे जाहीर केले होते. ही केवळ सरकारविरोधी टीका नाही तर भारताच्या एकात्मता, अखंडता आणि सार्वभौम अस्तित्वालाच नष्ट करण्याची भाषा आहे.
हे ही वाचा:
नैसर्गिक प्रकाश मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर
सुळे–पवार एकत्र आल्याने संभ्रम
चांगेरी गवत म्हणजे गुणांचा खजिना
फिलिपिन्समधील कचऱ्याचा ढिगारा कोसळून भीषण अपघात
उमर खालिद आणि शर्जील यांनी “जामिया मुस्लीम स्टुडंट्ससारख्या” व्हॉट्सॲप गटांच्या माध्यमातून २०२० मध्ये आंदोलनांचं समन्वय केल्याचंही पुढे आलं. अंतर्गत चॅट्स, भाषणं आणि रणनीती यातून हे स्पष्ट झालं की उद्देश फक्त निषेधाचा नव्हता, तर देशभर अस्थिरता निर्माण करून दंगली पेटवण्याचा होता. म्हणूनच UAPA अंतर्गत त्यांना जामीन नाकारण्यात आला, आणि सर्वोच्च न्यायालयानंही हा निर्णय योग्य ठरवला. तरीही सार्वजनिक चर्चेत डाव्यांकडून हा मुद्दा “राजकीय सूड” किंवा “मतभिन्नतेवर कारवाई” असाच रेटला जात आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या JNU विद्यापीठातील आंदोलनात डाव्या विचारसरणीचे गट “भगवा जला था, भगवा जलेगा JNU में” अशा घोषणा देत होते. या घटना काही अपवादात्मक किंवा निरुपद्रवी म्हणून कानाडोळा करावा अश्या नाहीत. एका संपूर्ण सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखीविषयी उघडपणे द्वेष व्यक्त करणारी ही भाषा आहे. हीच विधाने इतर धर्माबाबत केली गेली असती तर लगेच “हेट स्पीच” ठरली असती. पण इथे हीच विधाने “प्रगत”, “प्रतिरोधक” किंवा “क्रांतिकारी” म्हणून देशात सर्वत्र पसरवली जात आहेत. यातून एक सातत्यपूर्ण दुहेरी निकष दिसतो. एका बाजूला, हिंदू संघटनांकडून आलेली प्रत्येक गोष्ट “सांप्रदायिक”, “फॅसिस्ट” किंवा “धोकादायक” ठरवली जाते. तर, दुसऱ्या बाजूला मात्र डाव्या किंवा तथाकथित पुरोगामी गटांकडून आलेली देशविरोधी किंवा हिंदूविरोधी भाषा ही नेहमीच संदर्भ, परिस्थिती आणि भावना यांच्या नावाखाली खपवली जाते.
पण डावी इकोसिस्टम, माध्यमं आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेला त्यांचा बौद्धिक विचारवर्ग यामध्ये मोठी भूमिका बजावतो. “संघ, भाजपा किंवा अभाविपच हिंदू–मुस्लीम राजकारण करतात” असा एक साचा मुद्दाम तयार केला गेला आहे. त्यामुळे इतर कुठल्याही बाजूकडून आलेली आक्रमकता, द्वेष किंवा विभाजनकारी भूमिकेकडे दुर्लक्ष करणं किंवा योग्य ठरवणं सोपं जाईल.
खरं तर प्रश्न धर्माचा नाही, तर प्रामाणिकपणाचा आहे. जर देशविरोधी भाषा, हिंसक आव्हाने आणि सांस्कृतिक द्वेष चुकीचा असेल, तर तो कुठल्याही बाजूकडून आला तरी चुकीचाच मानायला हवा. लोकशाही टिकवायची असेल, तर सत्याकडे डोळेझाक करून चालणार नाही, एवढंच.
