पहलगाम हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, एक जवान हुतात्मा!

लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने दिली माहिती

पहलगाम हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक, एक जवान हुतात्मा!

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम खोऱ्यात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात शोध मोहीम तीव्र केली आहे. या शोध मोहिमेदरम्यान, उधमपूरच्या जंगलात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये एक जवान हुतात्मा झाला आहे. सध्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

दुड्डू बसंतगडच्या घनदाट जंगलात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. भारतीय सैन्याच्या म्हणण्यानुसार, हा वनक्षेत्र भारतीय सैन्याच्या ९व्या आणि १६व्या कॉर्प्सच्या सीमेवर आहे आणि येथे नैसर्गिक गुहा आणि दहशतवाद्यांसाठी लपण्याची ठिकाणे आहेत. सुरुवातीच्या माहितीनुसार, दोन दहशतवादी दिसले, ज्यांनी सैनिकांवर गोळीबार केला. भारतीय सैन्य, पॅरा आणि जेकेपी पथकाने देखील गोळीबार करत चोख प्रत्युत्तर दिले

भारतीय लष्कराने याला ‘ऑपरेशन बिर्लीगली’ असे नाव दिले आहे. लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सच्या म्हणण्यानुसार,  ६ पॅराशूट रेजिमेंट (स्पेशल फोर्सेस) चे सैनिक झंटू अली शेख हे गोळीबारात गंभीर जखमी झाले आणि नंतर त्यांचे निधन झाले. “त्याचे अदम्य धैर्य आणि त्याच्या टीमचे शौर्य कधीही विसरले जाणार नाही. या दुःखाच्या क्षणी आम्ही शोकग्रस्त कुटुंबासोबत एकजुटीने उभे आहोत,” असे भारतीय सैन्याच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने एक्सवर म्हटले.

“विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, आज उधमपूरमधील बसंतगड येथे जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत संयुक्त मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर, दहशतवाद्यांशी संपर्क स्थापित झाला आणि जोरदार गोळीबार झाला. सुरुवातीच्या चकमकीत आमच्या एका शूर सैनिकाला गंभीर दुखापत झाली आणि नंतर सर्वोत्तम वैद्यकीय प्रयत्नांनंतरही तो मृत्युमुखी पडला. ऑपरेशन अजूनही सुरू आहे,” असे व्हाईट नाईट कॉर्प्सच्या एक्स हँडलने म्हटले आहे.

हे ही वाचा : 

“असीम मुनीर आणि ओसामा बिन लादेन एकसारखेच; त्यांचा शेवटही सारखाच असावा”

पीओकेमधील ४२ सक्रीय लाँच पॅडवर भारतीय लष्कराची नजर!

सिंधू पाणी वाटप स्थगित झाले तर पाकिस्तानच्या नाकातोंडात पाणी

गौतम गंभीरला ‘ISIS काश्मीर’ कडून जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, उधमपूरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीची पहिली माहिती सकाळी नऊ वाजता मिळाली. तेव्हापासून ही चकमक सुरू आहे. गोळीबार थांबल्यानंतर आणि जंगलात शोध घेतल्यानंतरच दहशतवाद्यांना ठार मारल्याची पुष्टी होईल. या चकमकीत किती दहशतवादी मारले गेले किंवा जखमी झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Exit mobile version