फुटपाथवर भाजी विकणाऱ्या सावंत मावशीचा मुलगा झाला सीआरपीएफचा जवान

व्हायरल व्हीडिओमुळे हृदयस्पर्शी कहाणी आली समोर

फुटपाथवर भाजी विकणाऱ्या सावंत मावशीचा मुलगा झाला सीआरपीएफचा जवान

कुडाळ नगरपंचायत परिसरात आई भाजीविक्रीचा व्यवसाय करते. पती आजारी. त्यामुळे घर चालविण्याची जबाबदारी अनुराधा सावंत यांच्यावर. त्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच. अशा सगळ्या परिस्थितीत त्यांचा सुपुत्र गोपाळने आपल्या प्रयत्नांच्या जोरावर सीआरपीएफसारख्या दलात प्रवेश घेतला आणि त्यानंतर आपल्या आईला ही बातमी देण्यासाठी तो कुडाळमध्ये पोहोचला. त्यांच्या भेटीचा तो भावनिक आणि अश्रुंना वाट मोकळी करून देणारा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील शेटकरवाडीत गोपाळ सत्यवान सावंत राहतो. आता तो आईला घर चालविण्यासाठी मदत करणारच आहे पण देशाचाही भार वाहणार आहे.

हा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला असून व्हीडिओ पाहताना लोकांचेही डोळे भरून येत आहेत. गुलालाने माखलेला गोपाळ आपल्या आईच्या दिशेने येतो. ती रस्त्यावरच भाजीची पथारी अंथरून बसली आहे. तो आल्यावर तिच्या पायावर पडतो. तिच्या पायावर डोके ठेवतो आणि ती नंतर त्याला मिठीत घेते. दोघेही अश्रुंना वाट मोकळी करून देतात. गोपाळचा मित्र त्या दोघांनाही गुलालाने न्हाऊन काढतो. आपल्या आईचे कष्ट कमी करण्यासाठी त्याने केलेल्या मेहनतीचे चीज झाल्याची ही हृदयस्पर्शी कहाणी होती.

हे ही वाचा:

भाजपाचे नेते राज पुरोहित यांचे निधन

चीनमध्ये चांदी $१०० पार दर कडाडण्यामागे भारताचाही हात

अफाट प्रतिभा, पण अपूर्ण स्वप्न — विनोद कांबळीची अधुरी कारकीर्द

विराट–कुलदीप महाकाल चरणी, भस्म आरतीत सहभागी

 

गोपाळ अत्यंत सामान्य परिस्थितीत वाढलेला मुलगा. नोकरीसाठी शोधाशोध करत होता. त्याने अग्निवीरसाठी प्रयत्न केले, पोलिस दलात प्रवेश करण्यासाठी मेहनत घेतली पण त्याला संधी मिळाली नाही. पण त्याने संयम गमावला नाही. उलट कठोर शिस्त, मेहनत, व्यायाम याच्या जोरावर त्याने हे यश मिळविले. परिस्थितीला कधी त्याने दोष दिला नाही. देशसेवेचा विचार त्याने केला होता. त्यासाठी प्रयत्नही केले पण अखेर त्याने सीआरपीएफमध्ये प्रवेश घेतला.

गोपाळवर कुडाळ तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही हा व्हीडिओ शेअर करत गोपाळच्या कर्तृत्वाचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की,

आई, थोर तुझे संस्कार! कुडाळ जवळील ​पिंगुळी येथील शेटकरवाडी मध्ये राहणाऱ्या भाजीवाल्या सावंत मावशींचा मुलगा गोपाळ सावंत याची सीआरपीएफ (CRPF) मध्ये निवड झाली.

ज्या जागेवर ऊन-पावसाची तमा न बाळगता संघर्ष करून मावशींनी गोपाळला लहानाचं मोठं केलं आणि शिकवलं, त्याच जागेवर गोपाळने आज यशाचा गुलाल उधळला. आईच्या कष्टाची जाण असणारा मुलगा जेव्हा असा कर्तबगार होतो, तेव्हा त्या माऊलीच्या संघर्षाचं खऱ्या अर्थाने सार्थक होतं. ​गोपाळ, तुझं सहर्ष अभिनंदन! तुझ्या या कृतीचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. आईच्या कष्टाचं चीज केलंस, आता भारतमातेच्या सेवेत तुला उदंड यश लाभो, हीच सदिच्छा!

Exit mobile version