भारतीय संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर यानं अखेर आपल्या आरोग्याबद्दल मोठं अपडेट दिलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात झालेल्या गंभीर दुखापतीनंतर चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती, मात्र आता अय्यरनं स्वतः सांगितलं आहे की तो हळूहळू बरा होत आहे.
अय्यर ऑस्ट्रेलियाच्या डावातील ३४व्या षटकात हर्षित राणाच्या चेंडूवर एलेक्स कॅरीचा कॅच घेताना गंभीररीत्या जखमी झाला होता. तपासात समोर आलं की त्याच्या स्प्लीन (प्लीहा) मध्ये खोलवर इजा झाली होती. सामन्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि काही काळ सिडनीतील आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं.
BCCI कडून दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “श्रेयस अय्यरला अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता, पण तातडीच्या उपचारांमुळे रक्तस्त्राव थांबवण्यात यश आलं. सध्या त्याची तब्येत स्थिर आहे आणि त्याच्या आरोग्यावर तज्ज्ञ डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.”
दरम्यान, अय्यरनं स्वतः ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलं –
“मी अजूनही रिकव्हरीच्या प्रक्रियेत आहे, पण प्रत्येक दिवसासोबत सुधारतोय.
तुमच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल मनापासून आभारी आहे.”
या मालिकेत अय्यरनं पहिल्या सामन्यात ११, दुसऱ्या सामन्यात ६१ धावा केल्या होत्या. तिसऱ्या सामन्यात मात्र दुखापतीमुळे तो फलंदाजीला उतरू शकला नाही.
या सीरीजदरम्यान त्यानं ICC पुरुष वनडे रँकिंगमध्ये नववा क्रमांक मिळवला आहे.
