सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी १४ सप्टेंबर रोजी दुबई येथे होणारा भारत-पाकिस्तान एशिया कप टी-२० क्रिकेट सामना रद्द करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला. याचिकाकर्त्याने मांडले की सामना रविवारी नियोजित आहे. जर हा मुद्दा शुक्रवारीपर्यंत सूचीबद्ध झाला नाही तर याचिकेचा काही उपयोग राहणार नाही. याचिकेवर न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि विजय बिश्नोई यांच्या खंडपीठाने म्हटले, “या रविवारी सामना आहे, आपण काय करू शकतो? राहू द्या. सामना होऊ द्या.”
याचिकाकर्त्यांच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की त्यांचा पक्ष मजबूत असो वा नसो, प्रकरण किमान सुनावणीसाठी तरी सूचीबद्ध केले गेले पाहिजे. तथापि, न्यायमूर्ती माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने तातडीच्या सुनावणीच्या मागणीला नकार देत सामना होऊ द्यावा, असे स्पष्ट केले. चार विधी विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत म्हटले आहे की पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामना आयोजित करणे हे राष्ट्रीय सन्मान आणि जनभावनांच्या विरुद्ध संदेश देते.
हेही वाचा..
उज्जैनमध्ये अवैध बांधकामांवर कारवाई
नेपाळच्या लष्करप्रमुखांच्या मागे हिंदू राजाचे चित्र! काय मिळतो संदेश?
‘परिस्थिती सारखीच’: कॉंग्रेसच्या उदित राज यांनी नेपाळची तुलना भारताशी केली, भाजपाचे प्रत्युत्तर!
“अमेरिकेने जे केले तेच आम्ही केले” दोहा हल्ल्यानंतर नेतान्याहू असं का म्हणाले?
याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की दहशतवादाला आसरा देणाऱ्या पाकिस्तानसोबत खेळल्याने सशस्त्र दलांचा मनोबल खच्ची होतो. शहीद कुटुंबे व दहशतवादी हल्ल्याचे बळी ठरलेल्या लोकांच्या परिवारांना यातना होतात. याव्यतिरिक्त, याचिकेत नमूद करण्यात आले आहे की क्रिकेट कधीही राष्ट्रीय हित, नागरिकांचे जीवन किंवा सशस्त्र जवानांच्या बलिदानापेक्षा वरचे ठरू शकत नाही.
याचिकेत म्हटले आहे, “हा टी-२० सामना पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हातून प्राण गमावलेल्या बळींच्या कुटुंबीयांच्या भावनांना धक्का देईल. राष्ट्राची प्रतिष्ठा आणि नागरिकांची सुरक्षा ही केवळ मनोरंजनापेक्षा महत्त्वाची आहे. या सामन्याचे आयोजन सुरू ठेवणे हे राष्ट्राच्या सुरक्षेला, अखंडतेला आणि मनोबलाला घातक ठरेल. तसेच, याचिकेत हेही नमूद केले आहे की भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे आयोजन हे मनोरंजन आणि महसूल निर्मितीला शूर सैनिक व नागरिकांच्या जीवनापेक्षा अधिक महत्त्व दिले जात आहे, असे दर्शवते.
याचिकेत पुढे नमूद करण्यात आले आहे, “हा सामना भारतातील सर्व नागरिकांच्या भावनांची थट्टा करण्याशिवाय दुसरे काही नाही. बीसीसीआयला युवक व क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीत आणण्याची वेळ आली आहे. एशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ सप्टेंबर (रविवार) रोजी दुबई येथे होणार आहे. २१ सप्टेंबरलाही दोन्ही संघ आमनेसामने येऊ शकतात, तसेच फायनलमध्येही भिडू शकतात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याला देशातील सामाजिक व राजकीय संघटनांकडून विरोध केला जात आहे.
