काही दिवसांपूर्वी अग्निवीर अक्षय गवते हे कर्तव्य बजावत असताना त्यांना सियाचीनमध्ये वीरमरण आले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या भरपाईचा मुद्दा चर्चेत आला होता. ते अग्निवीर योजनेतून लष्करात दाखल झाले असल्यामुळे त्यांच्या निधनानंतर सेवेतील इतर लाभ त्यांना मिळणार नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. यानंतर भारतीय सैन्यदलाकडून त्यांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईबाबत घोषणा करण्यात आली होती. यानंतर आता महाराष्ट्र राज्य सरकारनेही गवते यांच्या कुटुंबियांना मदतीची घोषणा केली आहे.
राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर जाहीर केल्याप्रमाणे अक्षय गवते यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
“सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षय यांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. जवान अक्षय गवते हे चिखली तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे होते. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षय यांच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली,” असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी
जाहीर केली आहे.
जवान अक्षय गवते हे… pic.twitter.com/66b4L5XwVG— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 26, 2023
दोन दिवसांपूर्वी भारतीय लष्कराकडून अक्षय गवतेंच्या कुटुंबीयांना भरपाई स्वरूपात १ कोटी १३ लाखांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यात सेवानियमांनुसार नॉन कंट्रिब्युटरी इन्शुरन्स, सेवा निधी, आर्म्ड फोर्सेस बॅटल कॅज्युल्टी फंडमधून दिला जाणारा निधी, आर्मी वाईव्ह्ज वेल्फेअर फंडमधून दिला जाणारा निधी अशा एकूण रकमेचा समावेश आहे.
हे ही वाचा:
बीड मध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात १० जणांचा मृत्यू
प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचे आमंत्रण हे अहोभाग्य!
इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या राजीनामा मागितला
बेस्ट गरबाचे पारितोषिक जिंकले, मात्र आयोजकांनी केली पित्याची हत्या
सियाचीनमध्ये कर्तव्यावर तैनात असताना अग्निवीर योजनेतून लष्करात दाखल झालेले अक्षय गवते यांचं निधन झालं. त्यांचं निधन झालं, तेव्हा ते ‘लाईन ऑफ ड्युटी’वर तैनात होते. भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी विभागात ते पोस्टिंगवर होते. दरम्यान, अक्षय गवतेंच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक भरपाई दिली जात नसल्याचा दावा करत विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होऊ लागले होते.
