देशात ट्रॅक्टर्सची मागणी जोरदार वाढली असून, शेतीमधील यांत्रिकीकरणाकडे शेतकऱ्यांचा झुकाव वाढल्याचं स्पष्ट होतंय. ट्रॅक्टर उत्पादन क्षेत्रातील दिग्गज कंपनी सोनालिकाने चालू आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या चार महिन्यांत (एप्रिल ते जुलै) तब्बल 53,772 ट्रॅक्टर विक्रीचा विक्रम केला आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही यशस्वी विक्री केवळ मजबूत मागणीच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त ट्रॅक्टर्समुळे शक्य झाली आहे. सोनालिकाची एकत्रित उत्पादन युनिट दर दोन मिनिटांनी एक ट्रॅक्टर बनवते. इंधन-बचतीचे इंजिन, प्रगत हायड्रॉलिक्स आणि घरगुती निर्मितीची विश्वासार्ह गुणवत्ता हे या यशामागचं गमक आहे.
सोनालिका इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक रमन मित्तल म्हणाले, “आमचे हेवी ड्युटी ट्रॅक्टर्स केवळ मशिन्स नाहीत, तर शेतकऱ्यांसाठी आनंदाचा स्रोत आहेत. येणाऱ्या सणासुदीच्या काळात सोनालिका भारतभर पसरलेल्या डीलर नेटवर्कच्या माध्यमातून गरज भागवण्यास सज्ज आहे.”
ते पुढे म्हणाले की, “भारतीय कृषी उत्पादनक्षमता वाढवणे आणि देशातील शेतीच्या आधुनिकीकरणात पुढाकार घेणे हेच आमचं ध्येय आहे.”
महिंद्रा अँड महिंद्राची विक्रीही झाली वाढती!
महिंद्रा अँड महिंद्रानेही जुलै 2025 मध्ये चांगली विक्री नोंदवली. 26,990 ट्रॅक्टर भारतात विकले, जे की मागच्या वर्षी याच कालावधीतील 25,587 ट्रॅक्टर्सपेक्षा 5% जास्त आहेत. कंपनीने याच कालावधीत 1,718 ट्रॅक्टर्सचा निर्यात केला असून एकूण विक्री 28,708 युनिट्सवर पोहोचली आहे.
ग्रामीण उत्पन्नात वाढ ही वाढीमागील मुख्य कारण
नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) च्या अलीकडील सर्वेक्षणानुसार, 76.6% ग्रामीण कुटुंबांनी वाढलेली खपत नोंदवली, जे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा वेग वाढल्याचं सूचित करतं. शिवाय, 78.4% कुटुंबांना वाटतं की महागाई 5% पेक्षा कमी आहे – यावरून मूल्य स्थिरतेचीही जाणीव होते.
सर्वेक्षणात 74.7% लोकांनी पुढील वर्षी उत्पन्न वाढण्याची आशा व्यक्त केली, तर 56.2% लोकांनी लवकरच रोजगाराच्या संधी वाढतील, असं सांगितलं.
