पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज गोलंदाज वसीम अकरम यांनी पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमादरम्यान नाव न घेता इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ची टीका केली आणि पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) चे कौतुक केले. त्यांच्या वक्तव्यावर भारतीय फॅन्सने सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अकरम यांना मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागत आहे.
पीएसएलशी संबंधित एका प्रमोशन कार्यक्रमात वसीम अकरम म्हणाले, “पीएसएल आणि बीबीएल या सर्वोत्तम टी-वीस लीगा आहेत. दोन्ही लीग पस्तीस ते चाळीस दिवसांत संपतात. त्यामुळे विदेशी खेळाडू या लीगमध्ये खेळण्यास उत्सुक असतात. पण काही लीग अशाही आहेत की ‘मुलं मोठी होतात, पण लीग संपतच नाही.’ दोन-दीड किंवा तीन महिने हा कालावधी कोणासाठीही खूप मोठा असतो.”
अकरम यांनी जरी आयपीएलचे नाव घेतले नाही, तरी त्यांचा स्पष्ट इशारा आयपीएलकडेच होता. आयपीएल ही जगातील सर्वांत जास्त दिवस चालणारी टी-वीस लीग आहे. बीसीसीआयद्वारे चालविल्या जाणाऱ्या या लीगमध्ये दहा संघ खेळतात आणि संपूर्ण स्पर्धा जवळपास दोन महिने चालते.
अकरम पुढे म्हणाले की, “जेव्हा मी लीग क्रिकेटबद्दल चाहत्यांशी बोलतो, तेव्हा गोलंदाजीच्या बाबतीत सर्वप्रथम पीएसएलचे नाव घेतले जाते. पीएसएल ही क्रमांक एक लीग आहे.” या कार्यक्रमात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवीही उपस्थित होते आणि त्यांनीही पीएसएलला क्रमांक एक लीग म्हटले.
हेही वाचा:
‘इंडिगो’च्या गोंधळानंतर नव्या विमान कंपन्या सुरू करण्याचे सरकारकडून प्रयत्न
२२८ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अनिल अंबानींचा मुलगा जय अनमोल विरोधात गुन्हा
पाकिस्तानच्या कटोऱ्यात जागतिक नाणेनिधीकडून १.२ अब्ज डॉलर
वसीम अकरम आयपीएलशी कोच आणि समालोचक म्हणून दीर्घकाळ जोडले गेले होते. आयपीएल ही जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय लीग असून जगातील अव्वल क्रिकेटपटू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुक असतात. तरीदेखील अकरम यांनी पीएसएलचे कौतुक करत आयपीएलवर अप्रत्यक्ष टीका केल्याने भारतीय फॅन्स नाराज झाले आहेत. अनेक चाहत्यांनी अकरम यांच्यावर “ज्या थाळीत खाल्ले, त्याच थाळीत छेद केला” अशी टीका केली आहे.
सोशल मीडियावर वसीम अकरम यांना मोठ्या प्रमाणात विरोध आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
दोन हजार आठ मध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे.
