मागाठाणे मेट्रो स्टेशनबाहेर सध्या जे सुरू आहे, ते पाहता एक गोष्ट स्पष्ट दिसते—सार्वजनिक रस्त्यावर अक्षरशः विकासकांनीच कब्जा केला आहे, आणि प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. अवजड मिक्सर, डम्पर, ट्रक राजरोसपणे उभे राहतात, वाहतूक ठप्प होते, प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असतो; तरीही पोलिस आणि महापालिका कारवाईसाठी पुढे येत नाहीत. हा साधा हलगर्जीपणा नाही—ही उघडपणे डोळेझाक आहे, अशीच भावना निर्माण होते. इतका उघड प्रकार दिसत असताना यंत्रणा गप्प का? कुणाच्या दबावाखाली आहेत का, की कुणाच्या फायद्यासाठी नियमांना वाकवले जात आहे? नागरिक आता सरळ प्रश्न विचारत आहेत की पालिकेने मेट्रो स्टेशनबाहेरचा रस्ता विकासकाला विकलेला आहे का?
मागाठाणे मेट्रो स्टेशनबाहेरची स्थिती पादचाऱ्यांसाठी त्रासदायक बनली आहे. स्टेशनसमोर ओळीने उभे असलेले मिक्सर, डम्पर आणि ट्रक पाहिले की हा सार्वजनिक रस्ता नसून विकासकांची खाजगी जागा आहे की काय, असा संतापजनक प्रश्न पडतो. रोज हेच दृश्य, रोज तीच वाहतूक कोंडी, रोज तोच जीवघेणा गोंधळ—आणि तरीही प्रशासनाची एकही ठोस कारवाई नाही. पोलिस आणि बीएमसी इतके असहाय्य आहेत का, की जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत? जर मेट्रो स्टेशनसमोरच नियम पायदळी तुडवले जात असतील, तर सामान्य नागरिकांनी काय अपेक्षा ठेवायची? यासंदर्भात पालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल तांबे यांना ही बाब लक्षात आणून देण्यात आली होती, पण त्यांच्याकडून कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही.
स्टेशनबाहेर अधिकृत रिक्षा स्टँड असूनही त्या ठिकाणी जड वाहने उभी केली जातात. रिक्षाचालकांना प्रवासी घेण्यासाठी जागा नाही, प्रवाशांना गाड्यांच्या मधून वाट काढावी लागते. अनेकदा ट्रकचालक आणि रिक्षाचालकांमध्ये वाद होत असल्याचे स्थानिक सांगतात. दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असलेल्या या परिसरात अशी बेफिकिरी धोकादायक ठरत आहे. मध्यंतरी पोलिसांकडून या ट्रकचालकांना इशारा देण्यात आला होता, पण त्यानंतर पुन्हा एकदा जैसे थे परिस्थिती आहे.
या वाहनांमुळे फक्त स्टेशनसमोरील रस्ता नाही, तर आतील सार्वजनिक मार्गही अडवला जात आहे. दोन्ही बाजूंनी पार्किंग केल्याने सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होते. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना वेळेत पोहोचणे कठीण जाते, रिक्षाचा मीटर वाढतो आणि आर्थिक फटका बसतो. एखादी रुग्णवाहिका अडली किंवा अपघात घडला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, हा गंभीर प्रश्न आहे.
बांधकामाच्या ठिकाणाहून येणाऱ्या डम्पर आणि मिक्सरमुळे मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर सांडली जात आहे. मागाठाणे रस्ता चिखलाने माखलेला दिसतो. घसरड्या रस्त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पादचाऱ्यांसाठी असलेला सर्विस रोडही वाहनांनी व्यापला असून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छता आणि सुरक्षिततेचे दावे करणाऱ्या महापालिकेचे याकडे दुर्लक्ष का, असा सवाल विचारला जात आहे.
हेही वाचा :
बांगलादेशातील अल्पसंख्यकांसाठी १५ देशांतील हिंदू एकटवले!
तरुण आमदार मैथिली ठाकूर यांनी बिहारच्या आरोग्यमंत्र्यांनाच विचारला जाब
मेट्रो स्टेशनसारख्या गजबजलेल्या परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात डम्पर आणि मिक्सर उभे राहतात, तरीही ठोस कारवाई होत नाही, यामुळे नागरिकांमध्ये संशय अधिकच गडद झाला आहे. या वाहनांना कुणाचे अभय आहे का? पोलिस आणि पालिका जाणूनबुजून डोळेझाक करत आहेत का? यामागे आर्थिक हितसंबंध आहेत का? या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी होत आहे.
मागाठाणे मेट्रो स्टेशनबाहेर राजरोसपणे सुरू असलेला हा प्रकार तात्काळ थांबवून अनधिकृत पार्किंग हटवावे, रस्ता सुरक्षित करावा आणि संबंधित विकासकावर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे. दुर्घटना घडल्यावर हालचाल करण्यापेक्षा प्रशासनाने आताच पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा नागरिकांचा संताप अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता तरी प्रशासन जागे होणार का, हा प्रश्न मागाठाणेकरांना छळत आहे.
