भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोची PSLV- C62 ही मोहीम अपयशी ठरली. १२ जानेवारी २०२६ रोजी श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतरही या मोहिमेत वाहून नेण्यात आलेले सर्व १६ उपग्रह नष्ट झाले. तिसऱ्या टप्प्यात अपयश आल्याने सर्व १६ उपग्रहांची स्थिती अनिश्चित झाली. यानंतर पुन्हा एकदा चर्चा झाली ती मे २०२५ मध्ये झालेल्या मागील PSLV मोहिमेची. अशाच प्रकारचे अपयश त्या मोहिमेदरम्यान आले होते.
पीएसएलव्ही- डीएस प्रकारचे रॉकेट सकाळी १०.१७ वाजता आकाशात झेपावला. रॉकेटने पहिल्या दोन टप्प्यांमध्ये तसेच त्यांच्यातील विभाजन प्रक्रियेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. या टप्प्यांतील यशस्वी हालचालींमुळे देशभरातील लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, तिसऱ्या टप्प्याच्या इंजिन प्रज्वलनानंतर अचानक मोहीम अपयशी होत असल्याची लक्षणे दिसू लागली. कोणतीही माहिती मिळणे बंद झाले, ज्यामुळे उपग्रह कक्षेत स्थापित होण्यात अपयश आले असल्याचे स्पष्ट झाले. ही परिस्थिती मागील वर्षीच्या पीएसएलव्ही- सी ६१ मोहिमेतील अपयशासारखीच होती.
२६० टन वजनाचा आणि ४४.४ मीटर उंचीचा पीएसएलव्हीने सकाळी १०.१८ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाण केले. यात संरक्षण संशोधन व विकास संस्थेचा (DRDO) EOS-N1 (अन्वेषा) हा सागरी पाळत ठेवण्यासाठीचा मुख्य उपग्रह आणि त्यासोबतच १५ सह- उपग्रह होते. १७ मिनिटांच्या उड्डाणानंतर त्यांना ५१२ किलोमीटर अंतराच्या सूर्य- समकालिक कक्षेत स्थापित करण्याचा या मोहिमेचा हेतू होता. प्रक्षेपण सुरळीत सुरू झाले. इस्रोच्या थेट प्रक्षेपणात रॉकेट पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सामान्यपणे काम करत असल्याचे दाखवण्यात आले आणि तिसऱ्या टप्प्याच्या इंजिन प्रज्वलनानंतर अचानक बिघाड झाल्याचे लक्षात आले.
इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन म्हणाले की, रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्याच्या शेवटी, जेव्हा स्ट्रॅप-ऑन मोटर्स थ्रस्ट देत होते तेव्हा समस्या सुरू झाली. “तिसऱ्या टप्प्याच्या शेवटी वाहनाची कामगिरी सुरुवातीला सामान्य होती. मात्र त्यानंतर रॉकेटच्या रोल रेटमध्ये गडबड आणि उड्डाण मार्गात विचलन आढळून आले. आम्ही सध्या संपूर्ण माहितीचे विश्लेषण करत आहोत.”
हेही वाचा..
जर्मन चान्सलरांनी भारताला ‘पसंतीचा भागीदार’ म्हटले
अमेरिकी राजदूतांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी
केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह इस्रायल दौऱ्यावर जाणार
यापूर्वीही अशीच घटना घडली होती. मे २०२५ मध्ये झालेल्या मागील PSLV मोहिमेत तिसऱ्या टप्प्यात अडचणी आल्या होत्या. त्यामुळे सोमवारची घटना ही पुन्हा घडली असे म्हटले जात आहे. पीएसएलव्हीला बऱ्याच काळापासून इस्रोचा “वर्कहॉर्स” म्हणून ओळखले जात आहे. ज्याने चंद्र आणि मंगळावर मोहिमा यशस्वी आहेत आणि डझनभर देशांसाठी उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. ६० हून अधिक उड्डाणांपैकी फक्त काही उड्डाणे अयशस्वी झाली आहेत, परंतु सलग दोन अपयशांमुळे आता त्या प्रतिष्ठेला धोका निर्माण झाला आहे.
