केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशात “व्हाईट कॉलर दहशतवाद” वाढणे ही चिंताजनक बाब असल्याचे म्हटले. त्यांनी असा इशारा दिला की, मूल्यांशिवाय उच्च शिक्षण समाजासाठी धोकादायक ठरू शकते. भूपाल नोबल्स विद्यापीठाच्या १०४ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना, राजनाथ सिंह यांनी व्हाईट कॉलर दहशतवादाचा मुद्दा अधोरेखित केला. तसेच त्यांनी १० नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाचाही उल्लेख केला. या घटनेनंतरच ‘व्हाईट कॉलर दहशतवाद’ अधिक अधोरेखित झाला. राजनाथ सिंह यांनी नमूद केले की, हल्ल्यातील आरोपी हे पात्र डॉक्टर होते.
“आज देशात व्हाईट कॉलर दहशतवादाचा एक भयानक ट्रेंड उदयास येत आहे. उच्च शिक्षित लोक समाज आणि देशाविरुद्ध काम करत आहेत. दिल्ली बॉम्बस्फोटातील गुन्हेगार डॉक्टर होते. त्यांच्या हातात पदवी होती आणि खिशात आरडीएक्स होते. यावरून ज्ञानासोबत मूल्ये आणि चारित्र्य असण्याची गरज अधोरेखित होते,” असं राजनाथ सिंह म्हणाले.
“शिक्षणाचा उद्देश केवळ व्यावसायिक यश नाही तर नैतिकता, नीतिमत्ता आणि मानवी चारित्र्याचा विकास देखील आहे. कोणतीही शिक्षण व्यवस्था जी हे उद्दिष्ट पूर्ण करू शकत नाही, जी ज्ञानासोबत नम्रता, चारित्र्याची भावना आणि ‘धर्म’ (नीतिमत्ता) देत नाही, ती अपूर्ण आहे,” असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.
पुढे सिंह म्हणाले की, दहशतवादी अशिक्षित असतातच असे नाही आणि त्यांच्याकडे विद्यापीठाची पदवी असू शकते, परंतु त्यांच्याकडे शहाणपण आणि मूल्यांचा अभाव असतो. धर्माबद्दल बोलतो तेव्हा ते मंदिर, मशीद किंवा चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जाण्याशी जोडले जाऊ नये. धर्म म्हणजे कर्तव्याची भावना. धर्म आणि नैतिकतेशिवाय शिक्षण समाजासाठी उपयुक्त ठरणार नाही. म्हणूनच कधीकधी सुशिक्षित लोक गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे समोर येते, असे ते पुढे म्हणाले.
हे ही वाचा:
चाकू, हातोडे, हातमोजे आणि… इस्लामी कट्टरतावाद्याचा कट उधळला
“मोदी सरकार हटवण्यासाठी बांगलादेशसारखी निदर्शने आवश्यक”
भाजपा, महायुतीचे ६८ नगरसेवक बिनविरोध विजयी
जम्मू- काश्मीरमधून दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोघांना अटक
डॉ. उमर-उन-नबी याने चालवलेल्या स्फोटकांनी भरलेल्या आय- २० कारमध्ये हा स्फोट झाला आणि त्यात १५ जणांचा मृत्यू झाला. यानंतर तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला. ज्यामुळे मुझम्मिल गनई, आदिल राथेर आणि शाहिना सईद या तीन डॉक्टरांना अटक करण्यात आली.
